पुणे: आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी समजू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे. आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis takes a dig at shivsena leaders)
ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली, असा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचाही समाचार घेतला. जयंत पाटील यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांनी आपला पराभव मान्य केल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत ईव्हीएम यंत्रावर खापर फोडता येणार नाही म्हणून आता जयंत पाटील यांनी बोगस मतदारनोंदणीचा मुद्दा उकरून काढला आहे. आपण निवडणूक हारणार, याची जाणीव असल्याचे त्यांनी आतापासूनच कव्हर फायरिंग सुरु केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
तसेच पुणे पदवधीर मतदारसंघात भाजपच्या संग्राम देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित आहे. भाजपने चांगली नोंदणी केली आहे. कार्यकर्ते उत्साहाने काम करत आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच संग्राम देशमुख विजयी होतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
महाविकासआघाडी सरकारच्याविरोधात असंतोष आहे. महाविकासआघाडीतील कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर आपला रोष व्यक्त करतील, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यापुरता का होईना, पण भाजपच्या आंदोलनाची दखल घेतली, याचा आनंद असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आजपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना अनेक पत्रं पाठवली, सल्ले दिले. पण यापैकी एका पत्राचीही उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
(Devendra Fadnavis takes a dig at shivsena leaders)