मुंबईः तुम्हाला आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूचं खरं कारण आणि त्यामागील सत्य माहिती होतं तर 25 वर्षे का बोलला नाहीत? एवढी वर्ष यामागील कारण लपवून ठेवणं म्हणजे आनंद दिघे यांच्याप्रती बेईमानीच आहे, असं वक्तव्य औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलंय. आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या वक्तव्यानं सध्या शिवसैनिकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. अंबादास दानवे यांनीदेखील त्यांना सवाले केला आहे. यांना सत्य माहिती असेल तर पोलिसांकडून यांची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. तसंच आदित्य ठाकरेंवरून तानाजी सावंतांवर केलेल्या वक्तव्यालाही दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. आदित्य ठाकरे कोण आहेत हे महाराष्ट्राला आणि देशाला सध्या तरी सांगण्याची गरज नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल मालेगावमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. ते म्हणाले, मी आज काही बोलणार नाही, पण समोरून तोंड उघडेल तर मग मलाही बोलावं लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे, त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले, ‘ त्यांना कारण माहिती होतं तर पोलिसांनी त्यांचा तपास केला पाहिजे आत्ताही… 25 वर्ष त्यांनी का कारण लपवून ठेवलं, याचीही चौकशी झाली पाहिजे. केदार दिघेच जे आनंद दिघेंचे पुतणे, हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी हे वक्तव्य केलंय. आनंद दिघेंप्रति निष्ठा असेल तर 25 वर्ष त्यांच्या विषयीचं मत दाबून ठेवणं, ही त्यांच्याशी बेईमानी ठरेल. आता यावर विषयावर बोलण्याला अर्थ उरणार नाही…’
शिवसेना नेते आनंद दिघे यांचा मृ्त्यू 19 ऑगस्ट 2001 रोजी झाला. दिघे यांना हार्टचा प्रॉब्लेम होता. एकदा हार्ट अटॅक आल्यानंतरही ते बरे झाले होते. पण गणपतीच्या दिवसात ते पहाटे-पहाटेपर्यंत कार्यकर्त्यांच्या घरी भेटीगाठी घेत होते. त्याच प्रवासादरम्यान अपघातात ते जखमी झाले. पायाला फ्रॅक्चर झालं. उपचार घेताना त्यांना हार्ट अटॅक आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दिघे यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये मोठी तोडफोड केली होती. बाळासाहेबांपेक्षा आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत होतं म्हणून त्यांना संपवण्यात आलं, असा आरोप शिवसेनेवर केला जातो. यावरूनच नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जातात.