रायगड : शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. महेंद्र दळवी हे शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत. अलिबाग सत्र न्यायालयाने (Alibag Session Court) हा निर्णय दिला आहे. तीन वर्षांपूर्वी मारहाण प्रकरणात ही शिक्षा झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगडच्या राजकारणात नेहमीच काही ना काही मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतात. त्यातच आता या प्रकरणात असा निकाल आल्याने पुन्हा रायगडचं राजकारण ढवळून निघतंय. एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारची शिक्षा होणे ही पहिलीच वेळ नसली तरी मारहाणी सारख्या प्रकरणात ही शिक्षा झाल्याने सध्या राजकारणात याची जोरदार चर्चा आहे. या शिक्षेचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होतो का? हे आता येणाऱ्या निवडणुकानंतरच कळेल. मात्र सध्या तरी हे प्रकरण रायगडमध्ये गाजतंय.
आमदार महेंद्र दळवी यांच्यासह अन्य तिघांना दोन वर्षाचा कारावास असा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल आज आला आहे. निवडणुकीवरून दोन गटात तीन वर्षा पूर्वी हाणामारी झाली होती. यात एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यात आमदार महेंद्र दळवी, अंकुश पाटील,अनिल पाटील, अविनाश म्हात्रे यांना दोन वर्ष कारावास आणि रुपये पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सत्र न्यायलयाने सुनावली आहे, जातीवाचक शिवी गाळ, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण केली, असा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राजकारणात दोन गटात संघर्ष हा नेहमी ठरलेला असतो, स्थानिक लेव्हला या संघर्षाची तीव्रता अधिक असते. त्यातूनच हे प्रकरण घडलं आहे. त्यामुळे दळवी यांच्याकडून आता पुढील पर्यायांची चाचणी सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत अलिबागमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अनेक बंगले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच हे बंगले पहायला सोमय्या गेले होते. तेव्हा त्यांना याच दळवी यांनी इशारा देत विरोध केला होता. तेव्हाही दळवी बरेच चर्चेत आले होते. कोकणता शिवसेना नेत्यांची मोठी ताकद आहे. त्यातून राणे, भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष नेहीमी सुरूच असतो. त्या संघर्षाला अलिकडील काळात आता आणखी धार आली आहे.