मुंबई: लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्यासारख्या प्रचंड जनाधार असलेल्या नेत्याला अस्मान दाखवण्याची किमया साधलेले शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे कायमच चर्चेत असतात. सध्याच्या विखारी आणि द्वेषपूर्ण राजकारणात धैर्यशील माने यांच्यासारखा दिलदार आणि तरुणांना भुरळ घालणारा नेता निश्चितच वेगळा ठरतो. आजोबा आणि आईकडून राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर धैर्यशील माने यांनी ग्रामपंचायत स्तरापासून कामाला सुरुवात केली. त्यानंतर आपल्या कामगिरीच्या जोरावर आज ते संसेदत जाऊन पोहोचले आहेत.(Shivsena Kolhapur MP Dhairyasheel Mane Political journey)
धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने हे दीर्घकाळ काँग्रेस पक्षात होते. लहानपणापासूनच धैर्यशील माने त्यांच्यासोबत राहायचे. त्यामुळे धैर्यशील माने यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. बाळासाहेब माने यांनी रुकडी गावचे सरपंच ते संसदपटू असा थक्का करणारा प्रवास केला. त्यांनी पाचवेळा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांची सून निवेदिता माने यांनी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवला. त्यांनी अपक्ष आणि शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. अखेर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवेदिता माने लोकसभेवर निवडून गेल्या.
या काळात धैर्यशील माने हे त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. याच काळात धैर्यशील माने यांनी मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली. 2002 साली रुकडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मधून ते विजयी झाले.
ग्रामपंचायत स्तरावरून राजकारणाला सुरुवात केल्यानंतर अभ्यासूवृत्ती, आक्रमक वक्तृत्त्व आणि तरुणांचा पाठिंबा या तीन गोष्टींच्या जोरावर ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. 2007 साली ते जिल्हापरिषदेवर निवडून गेले. जिल्हा परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. त्यानंतर 2009 साली माने गटासाठी आव्हानात्मक काळ होता. राष्ट्रवादीत होणाऱ्या कुचंबणेमुळे ते अस्वस्थ होते.
अखेर नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. शिवसेनेने त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली.
मात्र, त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा असलेले स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचे आव्हान होते. ही लढाई धैर्यशील माने यांच्यासाठी खडतर मानला जात होती. मात्र, धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा 93 हजार 785 मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला.
या विजयानंतर धैर्यशील माने यांनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मनात कोणताही राग न ठेवता दिलदार वृत्तीचे दर्शन घडवले होते. धैर्यशील माने यांनी निवडणूक जिंकल्यानंतर थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद घेतला होता. राजकारणातील या नव्या कोल्हापुरी पॅटर्नची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.
खरं तर खासदार धैर्यशील माने हे वक्तृत्वशैलीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहेत. आपल्या तडफदार भाषणांनी धैर्यशील माने यांनी यापूर्वी अनेक सभा गाजवल्या आहेत. 2019 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर इस्लामपुरातील त्यांचं भाषण विशेष चर्चेत राहिलं होतं. कारण उभ्या पावसात धैर्यशील माने यांनी न थांबता भाषण केलं होतं. जोरदार पावसाला जणू धैर्यशील माने यांनी धारदार भाषणाने उत्तर दिलं होतं.
दुसरीकडे, एकच उल्हास, बाकी सब खल्लास, अशी गर्जना करत विधानसभा निवडणुकांच्या वेळी धैर्यशील माने यांनी शिरोळमधील शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठीही खणखणीत भाषण केलं होतं.
नुकत्याच पार पडलेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने आपली ताकद महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शुभम शेळके यांच्या पाठिशी उभी केली होती. यावेळी संजय राऊत आणि धैर्यशील माने या दोन नेत्यांनी शुभम शेळके यांना खूप मोठी मदत केली.
बेळगावमध्ये संजय राऊत यांनी घेतलेली सभा प्रचंड गाजली. त्याचप्रमाणे धैर्यशील माने यांनीही शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी अविरत घेतलेली मेहनतही तितकाच चर्चेचा विषय होता. शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी धैर्यशील माने अनेक दिवस बेळगावात तळ ठोकून होते. इतर नेते चारचाकी वाहनांनी फिरत असताना धैर्यशील माने यांनी सायकलवरुन फिरून बेळगावात प्रचार केला होता. त्यामुळेच पोटनिवडणुकीत शुभम शेळके यांना लाखभरापेक्षा अधिक मते मिळाली.
(Shivsena Kolhapur MP Dhairyasheel Mane Political journey)