नाशिक : भाजपसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंड केलं. त्यानंतर आघाडीशी काडीमोड घ्या आणि भाजपसोबत युती करा, असा प्रस्तावही या बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे ठेवला. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. त्यामुळे बंडखोरांनीच भाजपशी (bjp) हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता खासदारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत युती करण्याचा हेका उद्धव ठाकरेंसमोर धरला आहे. काल उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्रीवर बैठक झाली. त्यात या खासदारांनी युतीचा आग्रह धरला. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही या खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. शिवसेना खासदारांच्या या मागणीमुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपबरोबरची नैसर्गिक युती आगोदरची आहे. नाशिक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. देवळाली आणि सिन्नरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेच्या विरोधात लढून जिंकून आले आहेत. आघाडी झाली तर अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल? म्हणून नैसर्गिक युती करावी. अडीच वर्षाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचा कार्यकाळ आणि 25 वर्षाचा भाजपबरोबरचा अनुभव पाहता युती करायला हवी. आघाडीसोबतचे अनुभव चांगले नाहीत. त्यामुळे आघाडीसोबत राहायला नकोच, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. इतर खासादारांनीही ही मागणी केली आहे, असं गोडसे यांनी सांगितलं.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधून मार्ग काढण्याचा आग्रहही उद्धव ठाकरेंकडे करण्यात आला आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे. ते विचार करतील अशी आशा आहे. ते सकारात्मक विचार करतील असं आम्हाला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
या बैठकीत भाजपला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे असं आम्ही सांगितलं. त्यावर विचार करू असं उद्धवजी म्हणाले, असंही त्यांना सांगितल्याचं गोडसे यांनी स्पष्ट केलं.
केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. केंद्र आणि राज्य एकत्र नसल्याने प्रकल्प रखडले आहेत. युती झाल्यास हे प्रकल्प मार्गी लागतील. पर्यायाने राज्याचा विकास होईल, असंही ते म्हणाले.