मुंबई: मागासवर्गीय असल्यामुळेच आपल्याला मुंबई पोलिसांनी (mumbai police) पाणी दिलं नसल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी केला होता. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा यांचा पोलीस स्टेशनमध्ये कॉफी घेतानाचा व्हिडीओच त्यांच्या ट्विटरवर शेअर करून राणा यांच्या आरोपातील हवा काढून घेतली. त्यानंतर राणा यांच्या वकिलांनी हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यातील आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्यात राणा यांना चांगली वागणूक दिली नव्हती असा दावा केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील व्हिडिओ ट्विट करणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, काल उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचा व्हिडीओ आला नाही. मात्र, आता शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे (krupal tumane) यांनी राणा यांच्या आरोपांवर खुलासा करणारा पोलिसांचा व्हिडीओ कधी येणार हे जाहीर करून टाकलं. आज दुपारी 3 वाजेपर्यंत नवनीत राणा यांचा व्हिडीओ बाहेर येणार आहे. या नव्या व्हिडीओतून सर्व खुलासा होणार आहे, असं तुमाणे यांनी सांगितलं.
शिवसेना नेते सुरेश साखरे आणि खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत नवनीत राणा यांची नौटंकी काय आहे हे कळेल. त्यांची नौटंकी एक्सपोज होईल, असं कृपाल तुमाने म्हणाले. नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्राबद्दल प्रश्नचिन्हं आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेच्या भरवश्यावर त्यांची खासदारकी आहे. त्यांना हनुमान चालिसा वाचता येतो की नाही माहिती नाही, पण त्यांची ही नौटंकी आहे, असं तुमाने म्हणाले.
यावेळी शिवसेना नेते सुरेश साखरे यांनीही नवनीत राणा यांच्यावर टीका केली. हनुमान चालिसा घरी पठण करण्याचा भाग आहे, कुणाच्या घरी जाऊन नाही. त्यामुळे नवनीत राणा कारागृहात आहे, असं साखरे म्हणाले. जात प्रमाणपत्राबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राणा यांच्या विरोधात जाणार आहे. त्यामुळे त्यांचं मोदी शरणं गच्छामी आणि देवेंद्र शरणं गच्छामी सुरू आहे, अशी खोचक टीकाही साखरे यांनी केली.
दलित मुलीवर उत्तर प्रदेशात बलात्कार झाला. त्यावेळेस नवनीत राणा संसदेत काहीही बोलल्या नाही, हे दलित प्रेम आहे का? दलितांवर अत्याचार झाले. तेव्हा नवनीत राणा यांना दलित प्रेम दिसलं नाही. स्वत:वर आलं की त्यांना दलित प्रेम आठवते. कटकारस्थान रचता तेव्हा त्यांना दलित असल्याचं आठवत नाही, आपत्ती आलं की दलित असल्याचं आठवतं. दलित समाजाने राणा दाम्पत्याच्या समर्थनार्थ येऊ नये, असं आवाहन करतानाच केंद्रात मंत्रीपद मिळवण्यासाठी नवनीत राणा यांचे हे प्रयत्न आहेत, असा दावाही त्यांनी केला.