मुंबईः जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वाटेवर आहेत. येत्या काही दिवसात ते याची जाहीर वाच्यता करण्याची शक्यता आहे. मात्र संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज अर्जुन खोतकरांवर टीका न करता किंवा त्याच्यावर कोणताही संताप न व्यक्त करता चक्क त्यांचं अभिनंदन केलं. त्यांचं कौतुक केलं. त्याचं कारणही महत्त्वाचं आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आरोप करत नवी वाट धरली असं सांगितलंय. मात्र भाजपच्या किंवा ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाखाली असल्याचा आरोप केला जात आहे. अर्जुन खोतकर हे पहिलेच नेते आहेत, त्यांनी थेट माध्यमांसमोर अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. माझ्यावर आणि कुटुंबावर अशा प्रकारचा तणाव असल्यावर मी काय निर्णय घेतला पाहिजे, हे तुम्हीच सांगा, असं वक्तव्य खोतकर यांनी केलं होतं.
शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं कौतुक करताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, ‘ मी अर्जुन खोतकरांचं निवेदन ऐकलं. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. ते फार जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे. कोणत्या यंत्रणेचा आहे, का आहे.. त्यामुळे अशा संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. हे त्यांनी प्रामाणिक सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही. आम्ही हिंदुत्वामुळे सोडतोय. उद्धव ठाकरे यांच्यावर काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतोय ,अशी भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर दबाव असल्याचं स्पष्ट केलं. हे जास्त चांगलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
अर्जुन खोतकर काही दिवसांपूर्वी दिल्लीत ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदारांच्या बैठकीत ते बसलेले फोटोही आणि व्हिडिओदेखील व्हायरल झाले. त्यानंतर खोतकर शिंदे गटात गेल्याची चर्चाही सुरु झाली. खोतकरांनी अद्याप त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही, मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या पत्रानुसार, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला पाठिंबा दिला. मी जालन्याला गेल्यावर माझी भूमिका जाहीर करेन, असे खोतकर म्हणाले. तसेच आपल्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्याचंही त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं.