मुंबईः एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर राज्यात मोठं सत्तापरिवर्तन झालं. त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटातील शिवसेना आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास उद्धव ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार, महाविकास आघाडी कायम ठेवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच औरंगाबाद महानगरपालिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. औरंगाबाद महापालिकेत शिंदे गट आणि भाजप युती करणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये महापालिकेतील जागा वाटपाबद्दलही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर संजय राऊतांनीही (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. शिंदे गट काय निर्णय घेईल, याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, पण शिवसेना फोडण्याचे भाजपचे मनसुबे यशस्वी होणार नाही, असं ते म्हणाले.
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि भाजपात युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना काय करणार, असा सवाल संजय राऊतांना विचारला असता ते म्हणाले, ‘शिवसेना सर्व निवडणुका लढेल, स्वतंत्रपणे लढेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढेल, याविषयी एकत्र बसून निर्णय घेतला जाईल. पण आम्ही भाजपाला शिवसेना फोडायची होती. ती फोडून अशा प्रकारे महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांत महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करणारं त्यांचं कारस्थान होतं. आता जरी त्यांना यश मिळताना दिसत असलं तरीही हे दीर्घकाळ टीकणारं नाही…
जालन्याचे अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या वाटेवर आहेत. राऊतांनी मात्र खोतकरांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ मी अर्जुन खोतकरांचं निवेदन ऐकलं. त्यांचं अभिनंदन करतो. कारण त्याने प्रामाणिकपणे सांगितलं. ते फार जुने सहकारी आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्यावर आणि कुटुंबावर कोणत्या प्रकारचा तणाव आहे. कोणत्या यंत्रणेचा आहे.. त्यामुळे अशा संकटाच्या काळात कोणताही माणूस सुटकेचा मार्ग शोधतो. हे त्यांनी प्रामाणिक सांगितलं. त्याने हिंदुत्वाला बदनाम केलं नाही. आम्ही हिंदुत्वामुळे सोडतोय. उद्धव ठाकरे यांच्यावर काही आक्षेप असल्यामुळे शिवसेना सोडतोय. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर काही आक्षेप घेतोय ,अशी भूमिका न घेता अर्जुन खोतकर यांनी त्यांच्यावर दबाव असल्याचं स्पष्ट केलं. हे जास्त चांगलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.