सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचा विसर खुद्द शिवसेना खासदारालाच पडला आहे. शिवसेना सचिव आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय.
त्याचं झालं असं की खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील कोल्हापूर सिंधुदुर्ग जोडणारा आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. आंजिवडे येथे मीडियाशी बोलताना राऊत यांनी आघाडी सरकार मधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख चक्क राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केला.
सध्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. या आघाडीतील प्रत्येक मंत्री आमदार खासदार हे एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. बऱ्याच वेळा बोलताना ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे, त्याकडे कोणते पद आहे, याचंही भान नेत्यांना राहत नाही. राज्यातील टॉप लेव्हलचे नेते, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला.
माध्यमांशी बोलताना त्यांनी ओघात अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला. रस्ते विकासाच्या कामासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती देताना, “या रस्त्यांसंदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे बाजू मांडलेली आहे. त्यांनीही तत्वत: मंजूरी दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत”, असं विनायक राऊत म्हणाले.
विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्यानंतरही त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असणाऱ्यांच्याही हा संबंधित प्रकार लक्षात आला नाही. राऊत रस्तेकामासंदर्भात पुढची माहिती देतच राहिले. पण आपण काही वेळापूर्वी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंऐवजी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलंय, हे विनायक राऊतांच्याही लक्षाच आलं नाही.
स्वतःच्या पक्षातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा विसर विनायक राऊत यांना पडल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
(Shiv Sena MP Vinayak Raut forgets Uddhav Thackeray is the Chief Minister he says Ashok Chavan is the Chief Minister of maharashtra)
हे ही वाचा :
Weather Alert: पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून कोकण, गोव्यालाही अलर्ट