अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray Raj Thackeray) यांनी पुन्हा एकत्र यायला हवं का? हा प्रश्न सातत्यानं चर्चेत येत असतो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी (Shiv Sena Politics) केल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने विचारला जाऊ लागला. याच प्रश्नावर आता ठाकरे कुटुंबीयातील सदस्यानं महत्त्वाचं विधान केलंय. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीसोबत बातचीत केली.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय चढाओढीत इतरही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न जयदीप ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी ‘एकत्र आलंच पाहिजे’ असं स्पष्ट उत्तर जयदीप ठाकरे यांनी दिलं. ते मुंबईत टीव्ही 9 सोबत बोलत होते.
एकीकडे जयदेव ठाकरे यांनी जरी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं असलं, तरी त्यांचे वडील जयदेव ठाकरे मात्र एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळेही राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. वडील जयदेव ठाकरेंनंतर त्यांचा मुलगा जयदीप ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या राजकीय चढाओढीत नवी चिन्ह आणि नवी नावं दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दिली आहे. यावर जयदीप ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव जरी मिळालं असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.
निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह असेल, असं मंगळवारी स्पष्ट केलं. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात येत असल्याचं सोमवारी जाहीर केलं होतं. ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात येत असल्याचंही सोमवारीच स्पष्ट झालं होतं. तर त्याचवेळी शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव निवडणूक आयोगानं दिल्याचीही माहिती समोर आली होती.
अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे विरुद्ध शिंदे या राजकीय चढाओढीमध्ये महत्त्वाची परीक्षा होणार आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक ही दोन्ही गटासाठी लिटमस टेस्ट असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीला दोन्हीकडची प्रतिष्ठा पणाला लागलीय.