औरंगाबाद : मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कडचे आणखी दोन आमदार फुटणार असल्याचं संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. आता हे दोन आमदार नेमके काय आहेत, यावरुन चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं असलेल्या आमदारांची संख्या आधीच कमी आहे. त्यात आता आणखी दोन आमदार शिवसेनेतून (Shiv sena vs Ekanth Shinde) फुटणार असल्याच्या वृत्तानं तर्क वितर्क लढवले जात आहेत. संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली जात होती. एका कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं त्यांच्यावर निशाणा साधला जात होता. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भुमरेंनी शिवसेना आणखी फुटणार असल्याचे संकेत दिलेत. उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन आमदार शिंदे गटात येणार असल्याचं म्हटलंय. कारखान्याचा स्लिप बॉय असलेल्या भुमरेला आम्ही मंत्री केलं, असं उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात असलेल्या नेत्यांकडून वारंवार म्हटलं जात होतं. त्यावरुन संदीपान भुमरे यांनी टोला लगावत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या आमदारांबाबत सूचक विधान केलंय.
एकनाथ शिंदे गटात एकूण 40 शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडे दोन तृतीआंशपेक्षाही जास्त आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. आतापर्यंतच्या इतिहासातली शिवसेनेतली ही सगळ्यात मोठी बंडाळी होती. त्यामुळे आता पुन्हा नव्याने शिवसेना उभी करण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. हे आव्हान कायम असतानाच आणखी दोघा आमदारांच्या फुटण्याची चर्चा सुरु झाली आहे. संदीपान भुमरेंनी तसे संकेत दिल्यानं ते दोन आमदार नेमके कोण, यावरुन चर्चांना उधाण आलंय.
पैठणचे आमदार असलेल्या संदीपान भुमरे यांना मंत्रिपद देण्यात आलं. पण त्यांच्या औरंगाबादमधील एका कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या असल्याचे व्हिडीओ समोर आले. त्यामुळे संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता, भविष्यात संदीपान भुमरे यांच्या पाठीमागे मतदार उभे राहतील की नाही, यावरुन शंका घेतली गेली. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही घडामोडींना राजकीय दृष्टीकोनातून पाहिलं जातंय. या खुर्च्या रिकाम्या असणाऱ्या कार्यक्रमामुळे संदीपान भुमरे यांची भविष्यातली वाटचाल कठीण तर असणार नाही ना, अशीही शंका घेतली गेली. त्या सगळ्यावरुन विरोधकांनी भुमरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला भुमरे यांनीही सूचक प्रत्युत्तर दिलंय.