मुंबई : उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकाचा (Shiv sena News) मातोश्रीबाहेर रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने या शिवसैनिकाचं निधान झालं. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय. शहापूर तालुक्यातले भगवान काळे हे मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते. त्यांना उद्धव ठाकरेंची भेट घ्यायची होती. वाशाळा गाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन ते आपल्या गाडीने वांद्रे कलानगर येथील मातोश्री (Matoshree) या निवासस्थानी आले होते. मातोश्रीत बैठक सुरु असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. भगवान काळे यांना नंतर कलानगरच्या रुग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. भगवान काळे यांच्या मृत्यूने शहापुरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.
उद्धव ठाकरेंची भेट मिळत नसल्याच्या तक्रारी बंडखोर आमदारांकडून करण्यात आल्या होत्या. गुलाबराव पाटील यांनी विधानसभेतील भाषणातून या मुद्द्यावरुन शिवसेनेतल्या मोजक्या चार लोकांनी उद्धव ठाकरेंना बावरट केल्याचा आरोप केला होता. तसंच इतर बंडखोर आमदारांनीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेटत नव्हते, असा आरोप केला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता उद्धव ठाकरेंनी बैठकांचा धडाका लावला आहे. आधी आमदार, खासदार, त्यानंतर जिल्हा प्रमुख आणि मग महिला आघाडीच्या बैठकाही उद्धव ठाकरेंनी घेतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आता खरी शिवसेना नेमकी कुणाची हा वाद कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे कोर्टात नेमकं काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
एकीकडे शिवसेनेचे 40 आमदार फोडल्यानंतर आता शिवसेनेचे खासदारही फुटण्याची भीती आहे. शिवसेनेचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार राजन साळवी यांना शिवसेनेनं प्रतोद केलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात 11 जुलै रोजी नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.