नवी दिल्ली : एनडीएने बाहेरचा रस्ता दाखवत विरोधी बाकांवर व्यवस्था केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. ‘अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्याला तातडीने नुकसानभरपाई जाहीर करा, पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी बांधवांना आधार द्या’ अशा मागण्या करणारे फलक हाती धरत शिवसेना खासदारांनी (Shiv Sena protest outside Parliament) निदर्शनं केली.
संजय राऊत, विनायक राऊत, श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत हे शिवसेनेचे दोन्ही सभागृहातील खासदार आंदोलनात सहभागी होते. त्यानंतर शिवसेनेने लोकसभेतून सभात्याग केला. गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेला शिवसेनेचा राग मुंबई आणि दिल्लीतील आंदोलनातून बाहेर पडला.
Delhi: Shiv Sena leaders hold protest near the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Parliament premises, demanding to declare unseasonal rains in Maharashtra as natural calamity pic.twitter.com/RvEHPOGMzl
— ANI (@ANI) November 18, 2019
दुसरीकडे, मुंबईतही शिवसेनेने मेट्रो 3 विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेने गिरगावात मेट्रोविरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आहे.
मेट्रोच्या कामांमुळे डंपर 24 तास सुरु आहेत. भयंकर ट्रॅफिक जॅम होतं. डंपरमुळे अपघात होतात. आवाज आणि गोंगाटामुळे जगणं मुश्किल झालं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग सपकाळ यांनी दिला.
एनडीएतून बाहेरचा रस्ता
भाजपने शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी बाकावर जागा देत एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत काल घोषणा केली.
अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची रवानगी पहिल्या रांगेतून तिसऱ्या रांगेत करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतर खासदारांनाही नवीन जागा दिल्या जाणार आहेत. सावंत यांनी गेल्या आठवड्यात अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा देत सेना-भाजप युतीच्या फुटीचे संकेत दिले होते. त्यानंतर या मंत्रालयाचा अतिरिक्त भार प्रकाश जावडेकरांकडे सोपवण्यात आला.
शिवसेना एनडीएच्या बैठकांना हजर राहत नव्हती. त्यांचे मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना काँग्रेससोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनीच विरोधीपक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाशी सहमत आहे. म्हणूनच आम्ही शिवसेनेला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीबाकावर जागा दिली आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं, मग शिवसेना एनडीएच्या बैठकीला जाण्याचा आगाऊपणा कसा करेल? असा प्रतिप्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena protest outside Parliament) यांनी केला होता.