पुणे : (Shiv Sena) शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळणार का असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना आणि (Sambhaji Briged) संभाजी ब्रिगेडची युती होताच काही राजकीय नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर खोचक टीका केली आहे. तर कोणताच पर्याय उरला नसल्याने (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. हे सर्व असले तरी, मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडकर यांनी मात्र, या युतीचे स्वागत केले आहे. दोन्ही पक्षाची राजकीय गरज असल्याने ही युती झाली आहे. शिवाय यामुळे मराठा मते एकाच ठिकाणी राहण्यासही मदत होईल असा त्यांनी अंदाज लगावला आहे. त्यामुळे या अनपेक्षित युतीवर राजकीय गोठ्यातून वेगवेगळे मतप्रवाह असले तरी मात्र, पुरुषोत्तम खेडकर यांनी स्वागत आणि सल्लाही दिला आहे. शिवाय भविष्यात काही मतभेद झाले तरी ते वेळेनुसार आणि परस्थिती नुसार बदलण्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेतील वाढते बंड आणि भाजपसोबत शिंदेसेनेचे वाढते वजन पाहता आता शिवसेनेने थेट संभाजी ब्रिगेडसोबतच युती केली आहे. यामुळे प्रादेशिक पक्षाला बाजूला सारण्याचा डाव मोडीत काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे तर दुसरीकडे मराठा व्होट बॅंक हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता युती तर झाली पण जागा वाटाघाटी आणि इतर मुद्देही महत्वाचे आहेत.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती ही राजकीय गरज असल्यामुळे झाली आहे. गेल्या अडीच महिन्यातील राजकीय स्थिती पाहता ही युती झाल्याने त्याचे स्वागतच असल्याचे मत पुरुषोत्तम खेडकर यांनी व्यक्त केले आहे. शिवाय यामुळे मराठा मते सेनेकडे वळवण्यासाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे. असे असले तरी देन्ही गटाने किमान समान कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका बजावेल असा आशावाद खेडकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना पक्ष हा प्रबोधनकारांच्या विचारावर चालणारी सेना आहे. सेनेचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाहीय हे आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सेने पुन्हा उभारी घेईल, एवढेच नाहीतर दोन्हीमध्ये काही मतभेद निर्माण झाले तर परस्थितीनुसार योग्य ते बदलही करावे लागतील असेही पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे युतीमुळे उभारी मिळणार असली तरी योग्य वेळी योग्य निर्णय महत्वाचे ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.