मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेतून 39 आमदार फुटले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (bjp) राज्यात सत्ता स्थापन केली आहे. शिंदे गट एवढ्यावरच थांबलेला नाही तर त्यांनी मूळ शिवसेनेवरच दावा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना (shivsena) नेतृत्व खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदार आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून पक्षनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्रं घेऊन पक्षावर आपलीच कमांड असल्याचं दाखवण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलं. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. या बंडखोरांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे. आमचीच शिवसेना मूळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या बंडखोर गटाने शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू केला आहे. तसेच विधानसभेत शिवसेना या नावानेच आपला गट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना सावध झाली आहे. राज्यातील सत्ता हातातून गेली, आता पक्ष हातातून जाता कामा नये म्हणून शिवसेना कामाला लागली आहे. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसेनेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून निष्ठेचं प्रतिज्ञापत्रं घेण्यात येणार आहेत. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असून आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सही करून लिहून देण्यास सांगण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर माझा अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे, असा मजकूर या प्रतिज्ञापत्रात लिहून देण्यास सांगण्यात आलं आहे. त्या खाली स्वत:ची सही आणि कंसात शिवसेनेतील पद याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पक्षाची मान्यता हवी असेल आणि निवडणूक चिन्हं हवं असेल तर निवडणूक आयोगाकडे कार्यवाही करावी लागते. शिंदे गटाकडून 39 आमदारांच्या जोरावर निवडणूक आयोगाकडे शिवसेना या पक्षावर आणि शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष आपल्याच पाठी असल्याचं दाखवण्यासाठी शिवसेनेकडून आताच प्रतिज्ञापत्रं घेतल्या जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आपली बाजू भक्कमपणे मांडता येईल. त्यामुळे शिवसेनेवर कुणालाही दावा सांगता येणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं.