सुषमा अंधारे यांनी मानले भाजपचे आभार, कारण काय?; असं काय घडलं?

| Updated on: Feb 15, 2024 | 3:56 PM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मातृत्व तीर्थ ते शिवतीर्थ ही मुक्त संवाद यात्रा अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर येथे पोहचली. आज यात्रेचा 16 वा दिवस असून यावेळी सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महिला सुरक्षितता आणि द्वेष बुद्धीच राजकारण संपावं असं मत अंधारे यांनी व्यक्त केलंय. तसेच कायदा व्यवस्था बिघडत असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे यांनी मानले भाजपचे आभार, कारण काय?; असं काय घडलं?
sushama andhare
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

नगर | 15 फेब्रुवारी 2024 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपने राणेंऐवजी अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर नारायण भाऊंच्या दु:खात मी सहभागी आहे, असं म्हणत नारायण राणे यांना डिवचले आहे. सुषमा अंधारे नगरच्या दौऱ्यावर होत्या, यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राणेंना हा टोला लगावला. तसेच सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजपचे आभारही मानले.

आम्हाला आनंद आहे की, भाजपच्या यादीत काहीकाळ सहकारी म्हणून एकत्र राहिलेले ते लोक आहेत. मी त्या सर्वांचे अभिनंदन करते. मात्र नारायण भाऊ यांच्या दुःखात सहभागी आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजपचे आभारही मानले. भाजपने मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी न देता आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्याबद्दल भाजपचे आभारीच आहोत, असा चिमटाही त्यांनी काढला.

निकालाची उत्सुकता नाही

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेवर आज निकाल येणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार आपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे, मात्र या निकालांची सर्वसामान्य नागरिकांना फार उत्सुकता आहे, असं मला वाटत नाही. कारण स्वायत्त यंत्रणेचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे. त्यामुळे या यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उडालेला आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

गृहमंत्र्यांची पत्नीच सुरक्षित नाही

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या पत्नीचे संरक्षण करता येत नसल्याचा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. या राज्यात गृहमंत्र्यांची पत्नी सुरक्षित राहत नाही, तर सर्वसामान्यांच्या घरातील महिला कशा सुरक्षित राहतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर नुसता ओरखडा निघाला. त्यावेळेला गंभीर कलम लावली गेली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावरती फक्त शाई फेकली तरी सुद्धा संबंधित व्यक्तीवर 307 कलम लावण्यात आलं. पण पत्रकार निखिल वागळे यांच्यावर एवढा हल्ला होऊनही गुन्हा दाखल केला नाही. याचा अर्थ सत्याधाऱ्यांची जर माणसं असतील तर त्यांना खुलेआम सूट दिली जाते. नैतिकता म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची गुंजाइश येत नाही. कारण नैतिकतेचा आणि देवेंद्रजींचा फार काही संबंध उरलाय असं वाटत नाही, असा प्रहार त्यांनी केला.

घोसाळकरांची हत्या मॉरिसने केली नसावी

मुंबईत अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. त्यावरूनही अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. घोसाळकरांची हत्या करून मॉरिसनेही आत्महत्या केली. आता आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःला चार गोळ्या मारून घेऊ शकतो का? असा सवाल उपस्थित करत या हत्येमध्ये वेगळंच काहीतरी असण्याची शक्यता अंधारे यांनी बोलून दाखवली. हत्या करण्याआधी फेसबुक लाईव्ह फुटेजमध्ये मॉरिस आणि घोसाळकर यांच्या भोवती मृत्यूचं सावट दिसत नाही. कदाचित घोसाळकरांची हत्या मॉरिसनी केलेली नसावी. कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती देखील दिसत आहे, असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी या हत्येप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले असून गृह विभागावर निशाणा साधलाय.