मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात दोरदार घमासान सुरु आहे. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच या वादात शिवसेना पदाधिकाऱ्याने उडी घेतली आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू अशी डायरेक्ट धमकीच शिवसेनेने शिंदे गटाला दिली आहे.
शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, यावर अद्याप काहीही अपडेट समोर आलेली नाही.
दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर चर्चा करण्यासाठी शिंदे गटाची बैठक मंगळावरी पार पडली. शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे या बैठकीत जवळपास निश्चित झाले. दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार अशी घोषणा या बैठकीत झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
दसरा मेळाव्यावरुन शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन शिंदे गटाने शिवतीर्थावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण शिवतीर्थ मैदान कुदळ फावड्याने उखडून काढू असा गर्भित इशाराच युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळींनी शिंदे सरकारला दिला आहे.
शिवसेना ही फक्त उध्दव ठाकरेंच्या बापाची म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय दुसरा कोणाचाही मेळावा येथे होणार नाही असे कोळी म्हणाले.
जर या चाळीस गद्दारांनी कायदा आणि सत्तेचा गैरवापर करुन शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा प्रयत्न केला तर कुदळ फावडे घेऊन राज्यातील शिवसैनिक संपूर्ण शिवतीर्थ मैदान उखडून टाकतील अशी धमकी कोळी यांनी दिली आहे.
राज्यातील दळभद्री सरकार हे गुजरातच्या दावणीला बांधलेले असल्यामुळेच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. या सरकारने जाणीवपूर्वक हा प्रकल्प बाहेर जाऊ दिला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी तरुणांना रोजगार देण्यासाठी हा प्रकल्प राज्यात आणला होता. मात्र या सरकारने जाणीवपूर्वक हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला असा आरोप देखील कोळी यांनी केला आहे.