मुंबई : शिंदे गटाची स्थापना आणि त्यानंतर (Shivsena Party) शिवसेना पक्षातून होत असलेले इनकमिंग यामुळे आता शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच (J P Nadda) भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेना पक्ष आता लोप पावण्याच्या स्थितीत आहे असे विधान केले होते. एवढेच नाहीतर प्रादेशिक पक्षच आता संपण्याच्या मार्गावर असून भविष्यात भाजपाला विरोधकच उरणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. आता याचीच ‘री’ पकडत राज्यातील भाजपाचे नेते शिवसेना पक्ष हा संपणार असल्याचे विधान करीत आहेत. जे.पी.नड्डानंतर आता (Raosaheb Danve) खा. रावसाहेब दानवे यांनीही पुढील काळात शिवसेना पक्षाचे अस्तित्वच राहणार नसल्याचे म्हणले आहे. दानवे यांच्या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार हे निश्चित मानले जात आहे.
आतापर्यंत शिवसेना नेतृ्त्वाकडून सर्वसामान्य शिवसैनिकाला वेळ दिला जात नव्हता असा आरोप केला जात होता. त्यानंतर या पक्षाला हिंदुत्वाचा विसर पडल्यानेच महाविकास आघाडीचा उदय झाल्याचा आरोपही मध्यंतरी करण्यात आला होता. आता हे सर्व होत असताना भाजपाकडून शिवसेना हा परिवारवादी पक्ष असल्याची टिका होऊ लागली आहे. त्यामुळेच शिवसैनिकांचा रोष वाढत गेला आणि शिंदे गटाची स्थापना झाली आहे. जनतेला परिवारवाद मान्य नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच आगामी काळात हा पक्ष संपणार असल्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेनेकडून काय उत्तर येणार हे पहावे लागणार आहे.
भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी थेट प्रादेशिक पक्षावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. शिवसेना पक्ष तर संपेलच पण देशात भाजपाला भविष्यात विरोधकच राहणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. बिहारमध्ये भाजपाच्या जिल्हा कार्यालयांचं उद्घाटनप्रसंगी जे.पी.नड्डा यांनी हे भाकित वर्तवले होते. त्यानंतर विरोधकांकडून सडकून टिका करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टार्गेट केले आहे. आगामी काळात शिवसेना राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विरोधकांकडून अत्यंत खालच्या स्थरावरील राजकारण सुरु आहे. आतापर्यंत शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आता पक्ष संपवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, अशा अनेक संकटाचा सामना शिवसेनेने केला आहे. एवढेच नाहीतर अशी आव्हानं पायदळी तुडवत शिवसेनेने त्यावर झेंडा रोवला हा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेनेला आता कोर्टातील लढाईसोबतच रस्त्यावरची लढाईही लढवावी लागणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.