मुंबई: लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसं राजकीय घडामोडींना वेग येत आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यास नकार दिला आहे. मात्र तरीही भाजप नेते शिवसेनेला गळ घालत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे. “आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू स्थिती असेल. अशा परिस्थितीत भाजप नेते नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केलं जाऊ शकतं. जर तशी परिस्थिती आली, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल”, असं संजय राऊत म्हणाले.
एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेच्या शब्दकोषात युती हा शब्द नाही. भाजप केवळ स्वत:पुरती विचार करत आहे. स्वार्थी आहे. त्यामुळे आम्हीही केवल आमचाच विचार करु”
दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन, भाजप कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच त्यांनी विरोधकांना ‘पटकण्याची’ भाषा केली होती. त्यामुळे शिवसेना भाजपविरोधात आणखी आक्रमक झाली आहे.
भाजपचे सहकारी त्यांची साथ सोडून जात आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेना हा भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष आहे. शिवसेनेने भाजपविरोधी भूमिका घेतल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही असा अंदाज वर्तवला आहे. त्रिशंकू परिस्थिती होईल, त्यामुळे मोदींच्या नावाला अनेकांचा विरोध होऊन, गडकरींना पंतप्रधानपदाचा उमेदवार केलं जाऊ शकतं. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
काँग्रेसशिवाय महाआघाडी अपयशी
दुसरीकडे संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या महाआघाडीबाबतही भाष्य केलं. जर या महाआघाडीमध्ये काँग्रेसच नसेल, तर त्यांना यश येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. नुकतंच ममतांनी कोलकात्यात आयोजित केलेल्या महारॅलीमध्ये देशभरातील 20 पक्षांचे दिग्गज उपस्थित होते.