सांगली : शिवसेना (SHIVSENA) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. सुरुवातीला त्यांना केवळ 13 आमदारांचा पाठिंबा होता. मात्र आता सुंत्राकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा 46 वर पोहोचला आहे. शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येनं फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देण्याची शक्यता असल्याने राज्यभरातील शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. आज सांगलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर टरबूज फेक आंदोलन केले. या आंदोलना प्रकरणात पोलिसांकडून काही शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. भाजप फोडाफोडीचे राजकारण करून सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेसोबत बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. आता एकनाथ शिंदे भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. आज शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे यांच्यासह विजय शिंदे गजानन मोरे यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेकत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यालयाबाहेर असलेल्या सुरेश खाडे यांच्या डिजिटल फलकावर देखील टरबूज फेकण्यात आले.
दरम्यान आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो असे आंदोलकांनी म्हटले आहे. दुसरीकडे आज राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने आता शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ राहिले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.