मुंबई | 22 जानेवारी 2024 : शिवसेनेचे वांद्रे- खेरवाडीचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन झाले आहे. प्रदीर्घ आजाराने सोमवारी पहाटे साडे सहा वाजता त्यांची प्राण ज्योत मालवली. शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एक कट्टर शिवसैनिक म्हणून सरमळकर यांची ओखळ होती. शिवसेनेतून कोकणातील नेते नारायण राणे यांनी सोडचिट्टी दिल्ली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सरमळकर यांना श्रद्धांजली वाहीली आहे.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्या सोबत गेलेल्या महत्वाच्या नेत्यात श्रीकांत सरमळकर यांचा समावेश होता. त्यांनी कॉंग्रेसमधून पुन्हा 12 मार्च 2011 रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती मातोश्रीवर पु्न्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. श्रीकांत सरमळकर यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी 23 जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वांद्रे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असे कुटुंब आहे. श्रीकांत सरमळकर यांच्या निधनाने शिवसेनेतील एकेकाळचे धाडसी निडर नेते होते.