मुंबई : शिवसेनेने विमा कंपन्याच्या कार्यालावर उद्या अर्थात बुधवार 17 जुलैला धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा ‘इशारा मोर्चा’ काढण्यात येणार आहे. स्वत: उद्धव ठाकरे नेतृत्व करत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. या मोर्चाच्या निमित्ताने मुंबईत उद्या शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल.
वांद्रे कुर्ला संकुलातील विमा कंपनी कार्यालयांवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेसाठी शिवसेना विमा कंपन्यांच्या कार्यालयावर धडक देणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मोर्चा
“वेगवेगळे निकष लावून पीक विमा कंपन्या शेतकऱयांना पीक विम्यापासून वंचीत ठेवत आहेत. मोर्चाच्या माध्यमातून या कंपन्याना इशारा आहे. हा प्रातिनिधिक मोर्चा आहे. कंपन्याना हा इशारा आहे. विमा कार्यालये मुंबईत आहेत. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला जाणार आहे. आम्ही शेतकरी नसलो तरी शेतकऱ्यांच्या वेदना, दुःख जाणू शकतो. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे”, असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे या कंपन्याना ठराविक मुदत देतील.उद्या शिवसेनेची ताकद रस्त्यावर दिसेल, असंही आमदार परब म्हणाले.
शिवसेना सरकारमध्ये आहे. पण हा मोर्चा सरकारविरोधात नाही. हा विमा कंपन्यांविरोधातला मोर्चा आहे. सरकारला जी योजना राबवायची आहे ती राबवली जातेय, तरीसुद्धा काही निकषांचा आधार घेऊन शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय. अशा कंपन्यांवर शिवसेनेचा दबाव असेल. सरकारच्या कारवाईची वाट न पाहता शिवसेनेची ताकद उद्या दिसेल. या कंपन्याना शिवसेनेपुढे दबावेच लागेल, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.
संबंधित बातम्या
उद्धव ठाकरे UNCUT : विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा इशारा मोर्चा