अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत पराभवाला जबाबदार असणाऱ्या आमदार राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायम राहिल, असं मत भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी व्यक्त केलं आहे (Shivaji Kardile on Radhakrishna Vikhe Patil). ते अहमदनगर येथील एका खासगी कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल, अशी आशाही व्यक्त केली. भाजपचे वरिष्ठ नेते याबाबत आपल्याला भेटून गेल्याचंही कर्डिलेंनी नमूद केलं (Shivaji Kardile on Radhakrishna Vikhe Patil).
शिवाजी कर्डिले म्हणाले, “आम्ही आमचा पराभव झाल्यानंतर जी वस्तूस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवाबद्दल पुरावे घ्या आणि उदाहरण द्या, असं विखे यांनी वक्तव्य केलं होतं. पण आम्ही त्याचवेळेला एक नाही, तर अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरु झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाली आहे. दरम्यान, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील.”
“शिवसेना सत्तेसाठी लाचार होईल असं कधी वाटलं नव्हतं”
शिवाजी कर्डिले म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी सत्तास्थापनेआधी शिवसेनेकडून लेखी घेतल्याचं सांगितलं आहे. शिवसेना सत्तेसाठी इतकी लाचार होईल असं वाटलं नव्हतं. असंच चालत राहिलं, तर हे सरकार फार काळ टिकणार नाही.”
सरकारने शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला ठेऊन मुंबईसाठी नाईट लाईफचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ते फक्त मुंबईपुरते मर्यादित आहेत. तिन्ही पक्षांच्या या सरकारचं आलबेल आहे का नाही आहे सर्व राज्याला दिसतंय. जे काही चाललंय ते नाईलाजास्तव सुरु आहे, असाही आरोप शिवाजी कर्डिले यांनी केला.
“थोरातांसारखा अनुभवी माणूस असताना मुश्रीफ पालकमंत्री”
अहमदनगर जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्यातीलच असायला हवा होता. कारण त्याला जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती माहिती असते. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा अनुभवी माणूस असतानाही अहमदनगरचं पालकमंत्रिपद मुश्रीफ यांना दिलं. यावरुन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकमेकांवर विश्वास नसल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप शिवाजी कर्डिले यांनी केला.