मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन (Shivjayanti dispute) सुरु झालेला वाद वाढतच आहे. तारीख की तिथी यावरुन शिवजयंती वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिथी सोडा, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा, (Shivjayanti dispute)अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती (तारखेनुसार 19 फेब्रुवारी) साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे”, असं अनिल परब म्हणाले.
शिवजयंती एकच साजरी व्हावी हा वाद होता, त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंती बाबत निर्णय होईल, असं अनिल परब यांनी सांगितलं.
19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, तिथीचा हट्ट सोडा असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. त्याला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि भाजप आमदार नितेश राणे यांनीही पुष्टी जोडत, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करण्याची मागणी केली.
शिवजयंती वाद
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की, महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद सुरु होतो. आता पुन्हा तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असं आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंनीही एकच शिवजयंती झाली पाहिजे, असं म्हणत राष्ट्रवादीची सत्ता असल्याचं सांगत शिवसेनेला डिवचलं आहे.
“राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली (ShivJayanti dispute ) आहे.
शिवसेनेची भूमिका
शिवसेनेचं जर बोलायचं झालं तर शिवसेना आजवर तिथीनुसारच शिवजयंती साजरी करत आली आहे. गेल्यावेळी भाजपसोबत सत्तेत असतानाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजंयती साजरी करण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या
शिवजयंतीच्या तारीख आणि तिथीवरुन पुन्हा वाद, भाजपची शिवसेनेवर जोरदार टीका