नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी दिली आहे. तिघांचीही पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचा हा मोठा संघटनात्मक बदल मानला जातोय.
15 वर्षानंतर रमण सिंह आणि शिवराज सिंह पक्षाच्या कामासाठी लागणार आहेत. भाजपची दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या देण्यात आल्याने आगामी रणनीती आता आखली जाणार आहे. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली असताना भाजपने संघटनात्मक बदलांसाठी कंबर कसली आहे.
उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर शिवराज सिंह यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याबद्दल आभार. माझं काम मी पूर्ण निष्ठेने करेन, असं ट्वीट शिवराज यांनी केलं.
डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाला. यानंतर या तीन प्रमुख नेत्यांना आता पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाचा – मराठ्यांची लेक वसुंधरा राजे… मोदी-शाहांनाही आव्हान देणारी मुख्यमंत्री
भाजपने यापूर्वीच जाहिरनामा समिती, प्रचार समितीचीही घोषणा करण्यात आली आहे. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष गृहमंत्री राजनाथ सिंह, तर प्रचार समितीचे अध्यक्ष अर्थमंत्री अरुण जेटली आहेत. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणेंनाही स्थान देण्यात आलंय.