बीडः शिवसंग्राम पक्षाचे (Shivsangram) अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षाची जबाबदारी आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे द्यावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील विनंती केली. ज्योती मेटेंनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घ्यावी, या संदर्भातील ठराव शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी घेतला. शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची परळीमध्ये शिवसंग्राम च्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत ज्योती मेटे यांचा समावेश करावा, अशी मागणीसुद्धा यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. विनायक मेटे हे बीडहून मुंबईला जात असताना 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला जबरदस्त अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अशा आकस्मिक निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच पक्षाचं नेतृत्व ज्योती मेटे यांनी स्वीकारावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसंग्रामच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ लाखो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की, विनायक मेटे यांनी संपूर्ण जीवन मराठा समाजाच्या तसेच इतर लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. त्यांची काही स्वप्नं अधुरी राहिली आहेत. ती आम्हाला शिवसंग्रामच्या माध्यमातून पूर्ण करायची आहेत. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी एक जागा ज्योतीताई मेटे यांना द्यावी, अशी आम्ही आग्रही मागणी केली. राज्यपालांनीही त्यांचे मेटे साहेबांसोबत किती जिव्हाळ्याचे संबंध होते, या आठवणी शेअर केल्या. तसेच या प्रस्तावाचा सकारात्मक पद्धतीने विचार करू, असं आश्वासन राज्यपालांनी दिल्याचं शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर अप्पा कोलंगडे यांनी दिली आहे.
विनायक मेटे यांचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात आहे, असा संशय उपस्थित केला जातोय. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. मात्र अपघात नेमका कुठे झाला, यासंदर्भातील माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम स्पष्टपणे सांगत नसल्याचा आरोप मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केला आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 5.05 मिनिटांनी मेटे यांचा अपघात झाला होता. मात्र एक तासभर त्यांना मदत मिळाली नाही. सकाळी 6.20 मिनिटांनी त्यांना नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले. हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा तपास सध्या पोलील करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.