Breaking| शिवसेनेत मुख्य नेता पदच नाही, ठाकरे गटाच्या वकिलांचा आणखी दावा काय? आज रंगणार युक्तिवाद!

| Updated on: Jan 17, 2023 | 2:00 PM

ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून महत्त्वाचा युक्तिवाद केला जाईल. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी यासंदर्भात टीव्ही 9 कडे प्रतिक्रिया दिली.

Breaking| शिवसेनेत मुख्य नेता पदच नाही, ठाकरे गटाच्या वकिलांचा आणखी दावा काय? आज रंगणार युक्तिवाद!
Image Credit source: social media
Follow us on

प्रदीप कापसे, मुंबईः शिवसेनेतील (Shivsena) एक तृतीयांश सदस्यांचं पाठबळ आपल्याकडे असल्याने मीच मुख्य नेता आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार करण्यात येतोय. आम्ही म्हणजेच शिवसेना असेही वारंवार सांगण्यात येतंय. मात्र हाच दावा ठाकरे (Thackeray) गटाकडून खोडून काढण्यात येणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election commission) होणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून महत्त्वाचा युक्तिवाद केला जाईल. ठाकरे गटाचे वकील सनी जैन यांनी यासंदर्भात टीव्ही 9 कडे प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेता असं कोणतंही पद नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ज्या घटनेनुसार, एकनाथ शिंदे स्वतःला मुख्य नेता असल्याचा दावा करत आहेत, ती नेमकी कोणती आहे, हे पहावं लागेल, अशी प्रतिक्रिया सनी जैन यांनी दिली आहे. तसेच शिंदे गटाने केलेले नेमके कोणते दावे खोडून काढणार, यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

सनी जैन म्हणाले, शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्य नेता असं पद नाहीये. तर पक्षप्रमुख हे पद आहे. येत्या २३ जानेवारी रोजी पक्ष प्रमुख पदाची मुदत संपणार आहे. त्यासाठी आम्ही आयोगाकडे शिवसेना प्रतिनिधी सभेची निवडणूक घेण्यासाठी रितसर परवानगी मागितली आहे. आयोगाने ती दिली तर उत्तमच आहे. अन्यथा त्याचे काय काय परिणाम होतील, हे आम्ही आयोगाला सांगणार आहोत.

आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची घटना सादर केली जाणार आहे. तसेच शिंदे गटाने गेल्या सुनावणीत केलेल्या मुद्द्याचं ठाकरे गटाच्या वकिलांमार्फत खंडन केलं जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख पद अवैधरित्या मिळवल्याचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.

शिवसेनेची घटनाच बेकायदेशीर आहे, असा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला. हा दावा ठाकरे गटाकडून खोडून काढण्यात येणार आहे. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, ती निकाली लागल्याशिवाय निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी विनंतीही आयोगाकडे करण्यात येणार आहे, अशी माहिती सनी जैन यांनी दिली.