मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळण्यामागे इतर अनेक कारणं असली तरीही सर्वात मोठं कारण नाना पटोले (Nana Patole) आहेत, अशी गंभीर भूमिका शिवसेनेने घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या वादात आता शिवसेनेने उघड भूमिका घेतली आहे. याआधीही संजय राऊत यांनी या वादावर भाष्य केलं होतं. मात्र आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी हे प्रमुख कारण असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
केंद्र सरकारवर राहुल गांधी हे अदानी प्रकरणावरून ताकतीने आरोप करत असताना महाराष्ट्रात मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये विपरीत स्थिती आहे. पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयता लोण्याचा गोळा पडू शकतो, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखातून बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची बाजू घेण्यात आली आहे. थोरात हा महाराष्ट्र काँग्रेसचा एक निष्ठावंत चेहरा आहे. अनेक वादळात त्यांनी काँग्रेसला धरून ठेवलं. पण नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसने विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानीत केले, असा आरोप थोरात यांनी केला आहे. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान राखायचा नाही तर कुणाचा राखायचा, असा सवाल सामनातून नाना पटोले यांना विचारण्यात आलाय.
महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचं प्रमुख कारण नाना पटोले असल्याचा स्पष्ट आरोप सामनातून करण्यात आला आहे. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपाणाचा निर्णय नव्हता व तिथूनच संकटांची मालिका सुरु झाली. अध्यक्षपदी पटोले असते तर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेले अनेक पेच टाळता आले असते. पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणं सोपं झालं असतं. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही, त्याचाच फायदा पुढे खोकेबाज आमदार आणि त्यांच्या दिल्लीतील महाशक्तीला झाला, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
नाना पटोले यांचा तो एक निर्णय घिसाडघाई आणि अपरिपक्व होता. महाराष्ट्रात चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले, हे सत्य मान्य करावेच लागेल, अशी स्पष्टोक्ती सामनातून करण्यात आली आहे.