ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) शिवसेना-भाजपची युती (Shivsena and BJP alliance break in KDMC) असताना आता भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. केडीएमसीत स्थायी समिती पदासाठी निवडणूक आहे. यासाठी आता दोन्ही पक्षाने अर्ज भरला आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीत (Shivsena and BJP alliance break in KDMC) रंगत आली आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार अर्ज भरणार होता. पण ऐनवेळी युतीत असतानाही भाजपकडून अर्ज भरण्यात आला. शिवसेनेकडून गणेश कोट तर भाजपकडून विकास म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा एक गट नाराज आहे. त्यांमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत भाजपला धक्का दिला. मात्र केडीएमसीत युती अभेद होती. केडीएमसीत महापौर शिवसेनेचा आहे तर उपमहापौर भाजपकडे आहे.
केडीएमसीत 3 जानेवारीला स्थायी समिती सभापती निवडणूक होणार आहे. आज या पदासाठी अर्ज भरला गेला. सुरुवातीला बोलले जात होते की, शिवसेनेचे गणेश कोट हे बिनविरोध होणार आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या वेळ संपण्याच्या 20 मिनिटं आधी भाजपचे केडीएमसी गटनेते विकास म्हात्रे यांनी सभापती पदासाठी अर्ज भरल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली.
“महापौर पदासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली. यावेळी शिवसेना भाजपला महापौर पद देणार होते. पण त्यांनी ते दिले नाही. यावेळची स्थायी समिती सभापती पद भाजपला देणार होते तेही दिले नाही. यासाठी आम्ही अर्ज भरला असून माघार घेणार नाही”, असं भाजपचे उमेदवार विकास म्हात्रे यांनी सांगितले.
“भाजपने आत्मचिंतन करावे. आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. वरिष्ठ पातळीवर बोलणे सुरु आहे. येत्या 3 तारखेला स्पष्ट होईल”, असं शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
केडीएमसीचे स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत त्यापैकी 8 शिवसेनेचे, 6 भाजपचे, मनसे 1 आणि काँग्रेसचा 1 सदस्य आहे. शिवसेनेचा एक सदस्य नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फटका शिवसेनेला होऊ शकतो. काँग्रेस शिवसेनेसोबत गेले तरी मनसेची भूमिका निर्णायक राहील.