डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC Mahanagarpalika Election) आगामी निवडणूक शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकत्रितरित्या लढवली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घटनांवरुन तसे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अद्याप पुष्टी झाली नसून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Kalyan Dombivli Mahnagarpalika Election 2021)
या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार अशी घोषणा शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा केली आहे. दुसरीकडे भाजप मनसेची युती होणार अशीही चर्चा शहरात रंगली आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता शहरात पुन्हा भाजप-सेना नेत्यांची दिलजमाई होताना दिसत आहे.
26 जानेवारी रोजी शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे न बोलावता भाजपच्या कार्यक्रमात पोहचले होते. यावेळी त्यांनी केलेल्या छोटेखानी भाषणाची प्रचंड चर्चा सुरु आहे. सोशल डिस्टसिंग ठेवा. मात्र मनात डिस्टन्स ठेवू नका असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेत्यांना केले होते.
विशष म्हणजे राज्यात शिवसेनेशी 36 चा आकडा असूनही भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याचे समर्थन केले. ही चांगली गोष्ट आहे. मनात डिस्टन्स राहिला नाही तर विकास कामे होतील. शहर चांगले होऊ शकते. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे.
भाजपने कल्याणच्या पत्रीपुलाजवळ नवीन पूल आणि पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाला नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम स्थानिक भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. या चौकाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव देण्यात आले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम सुरू असताना अचानक शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांना पाहून भाजपचे सर्व कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले.
त्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी माईक हातात घेऊन चौका संदर्भात भाषण दिले. मला बोलावले नसले तरी मी आलो. सोशल डिस्टन्सिंग किती जरी असली तरी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवू नका, असं आवाहन त्यांनी भाजपला केले. ज्या ठिकाणी चौकाला नाव देण्यात आले आहे त्याच ठिकाणी पत्रीपुलाचा लोकार्पण सोहळा काल पार पडला होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टींना महत्त्व प्राप्त झाले होते.
संबंधित बातम्या:
लातुरात सेनेनं काँग्रेससोबत फिक्सिंग केल्याचं दिसतंय: दरेकर
…तर मी राजीनामा दिला असता, संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुखांना डिवचलं
(Kalyan Dombivli Mahnagarpalika Election 2021)