मुंबई : कावळ्यांची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केल्यानंतर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून (Shivsena Saamana) पवारांना सवाल केला आहे. ‘जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’ असा प्रश्न शिवसेनेने शरद पवारांना विचारला आहे.
“पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!” या मथळ्याखाली ‘सामना’चा आग्रलेख लिहिण्यात आला आहे. ‘जे उरलेले मावळे आहेत, त्यांच्या जोरावर पक्षबांधणी करु असा तुम्हाला विश्वास आहे. पण जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते?’ असा प्रतिप्रश्न पवारांना करण्यात आला आहे.
’15 वर्षे तुमच्यासोबत राहून ते मावळे होऊ शकले नाहीत, कारण ते कावळेच होते. शरद पवार आता शिवसैनिकांची भाषा बोलू लागले आहेत.’ असा टोमणाही पवारांना लगावण्यात आला.
महाराष्ट्रात युती होणारच. आमचा फॉर्म्युला ठरला आहे, असा विश्वास व्यक्त करताना ‘उडून जाणारे कावळे आम्हाला नकोत. राज्य मावळ्यांचंच आहे. जिथे युतीला गरज आहे, तिथे नव्या मावळ्यांचं स्वागत होईल’ असे संकेतच शिवसेनेने दिले आहेत.
‘भगदाड, खिंडार हे शब्द आता तोकडे पडत आहेत. आता लोट बाहेर पडत आहेत. आभाळ फाटल्यासारखी राष्ट्रवादी, काँग्रेसला गळती लागली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचा खुराडा रिकामा झाला आहे. राष्ट्रवादीच्या गोठ्यातली अनेक दुभती जनावरं दावणी तोडून बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी 2014 ला विधानसभेच्या निकालानंतर फालतु काव-काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते’ अशी टीकाही ‘सामना’मधून करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत. त्यामुळे पक्षगळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करायची, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली होती.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवार बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत ते यंत्रणा काय चालवणार? अशा शब्दात पवारांनी सरकारवर टीका केली होती.
निवडणुकीला सामोरे जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीने करण्याचा विचार केला जाईल, असंही पवार म्हणाले होते.
युतीमध्ये इनकमिंग
शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले धनराज महाले (Dhanraj Mahale) शिवसेनेत परतले. रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), दिलीप सोपल (Dilip Sopal) यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या वेळी रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला आहे.
त्याशिवाय, सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी भाजपमध्ये, तर काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.