मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि शिवसेनेच्या अटी याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना 23 आणि भाजप 25 जागांवर लढणार आहे.
विविध मुद्द्यांवर एकमत झाल्यामुळे आपण युतीसाठी एकत्रित झालो असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शेतकरी कर्जमाफीसंबंधी प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचित असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय रिफायनरी प्रकल्प आणि इतर मागण्यांबाबतही शिवसेना-भाजपात एकमत झालंय. आपण गेली 50 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनाच आपल्या भांडणाचा फायदा होऊ नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मनातली भावना पूर्ण झाली असल्याचं सांगत अमित शाहांनी युतीचं स्वागत केलं. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. लोकसभेनंतर महाराष्ट्र विधानसभेसाठीही चार महिन्यात निवडणूक आहे. त्यामुळे जबाबदारी आणि जागाही निम्म्या वाटून घेणार असल्याचं अमित शाहांनी जाहीर केलं.
शिवसेना-भाजप एकत्रितपणे राज्यभर फिरणार
युतीच्या घोषणेसोबतच शक्तीप्रदर्शनाचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यात सध्या दुष्काळ हा गंभीर मुदद् आहे. सरकार म्हणून आम्ही काम करत आहोतच, पण पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप मिळून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांशीही एकत्रितपणे चर्चा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. शिवसेना-भाजप युतीची यानंतर एकत्रित सभा होऊ शकते असा अंदाज लावला जातोय.
शिवसेनेच्या तीन अटी
युतीच्या चर्चेपूर्वीच शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरी प्रश्नांसह अनेक अटी भाजपने मान्य केल्या. यापैकी पहिली अट म्हणजे लोकसभेचा फॉर्म्युला. शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने 48 जागांपैकी 42 जागा जिंकल्या होत्या. 2014 ला भाजपने काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. पण यावेळी ही युती फक्त शिवसेना आणि भाजप यांचीच आहे.
दुसरी अट म्हणजे विधानसभेचा फॉर्म्युला. या पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विधानसभेलाही निम्म्या निम्म्या जागा लढवल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्षांशी चर्चा केली जाईल आणि उरलेल्या जागा निम्म्या निम्म्म्या लढवल्या जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेनेची तिसरी अट म्हणजे कोकणातील नाणारमधला रिफायनरी प्रकल्प. या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध केलाय. स्थानिकांनी शिवसेनेकडे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी दाद मागितली होती. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे. जिथे जागेचा प्रश्न नसेल तिथे हा प्रकल्प हलवला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.