अहमदनगर : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आई-वडिलच नसल्यामुळे भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांना गहिवरुन आलं होतं. पण मी त्याच्यासोबत नसलो तरी शिवसेना-भाजप युतीचे सर्व नेते त्याच्यासोबतच आहेत, असं भावूक वक्तव्य सुजय यांचे वडील आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय.
नगरमध्ये सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यावेळी आपले आई-वडील सोबत नसल्याने त्यांना गहिवरून आलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांची यावर प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्याच्यासोबत त्याचा आत्मविश्वास आहे. तसेच त्याच्या आजपर्यंत राजकीय जीवनात माझं मार्गदर्शन त्याच्या सोबत असून तो चुकीचा निर्णय घेईल असे मला वाटत नाही, असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला.
विखे पाटील काय म्हणाले? पाहा व्हिडीओ
VIDEO : मी नसलो म्हणून काय झालं, युतीचे सर्व नेते सुजयसोबत आहेत, विखे पाटलांची प्रतिक्रिया pic.twitter.com/5xJfCOPCST
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2019
सुजय विखेही भावूक
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला कोणाची आठवण येते असं विचारताच आई-वडिलांच्या आठवणीने सुजय विखेंना गहिवरून आलं. अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई-वडिलांची आठवण येते. मात्र माझ्या सोबत असलेले असंख्य कार्यकर्ते हेच माझे आई-वडील आहेत, असं भावनिक वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.
जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आलेत. कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे प्रेम दिलं ते आधारस्तंभ आमच्यासोबत आज नाहीत. द्वेषाच्या राजकारणामुळे माझ्या आई वडिलांना येता आलं नाही. माझे काका या ठिकाणी आले आहेत. पण आई-वडील नसल्याची सल मनात आहे. पक्ष कुटुंब म्हणून काम करतील आणि आई वडिलांची कमी पडणार नाही. मी आई वडिलांना भेटायला गेलो, आशीर्वाद घेतला. मुलगा या नात्याने मी आशीर्वाद घेऊन आलो, असंही सुजय विखे म्हणाले.