मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (गुरुवार 28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ दैनिकाचं संपादकपद (Shivsena Uddhav Thackeray Saamana) सोडलं.
‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. मात्र एकाच वेळी दोन पदांवर राहू शकत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चं संपादकपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. आता कार्यकारी संपादक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘सामना’चे संपादक असतील.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 23 जानेवारी 1988 रोजी ‘सामना’ या दैनिकाची सुरुवात केली. पाच वर्षांनी हिंदी भाषेत ‘दोपहर का सामना’ सुरु करण्यात आला. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना वेळोवेळी आपल्या भूमिका मांडत आली आहे. सडेतोड टीकेपासून स्तुतिसुमनांपर्यंत विविधांगी अग्रलेख ‘सामना’त वाचायला मिळतात. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना ‘सामनाचे संस्थापक संपादक’ (Shivsena Uddhav Thackeray Saamana) असं पद बहाल केलं.
उद्धव ठाकरे यांची कारकीर्द
उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर 2004 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना आपला उत्तराधिकारी घोषित केलं.
अब की बार ‘ठाकरे सरकार’, उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थ सज्ज, कोण कोण शपथ घेणार?
उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवी संपादन केली. उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून त्यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडलं आहे.
शिवतीर्थावर शपथविधी
जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने हा शपथविधी रंगणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील.
शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरच सहा हजार चौरस फुटांचं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. मंचावर 300 जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंसोबत कोण शपथ घेणार?
उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित समजले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच जयंत पाटील आणि छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शपथ घेणार असल्याचं म्हटलं जातं. (Shivsena Uddhav Thackeray Saamana)