ना आदित्य, ना उद्धव ठाकरे, ‘या’ नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

| Updated on: Nov 22, 2019 | 10:07 AM

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 'सिल्व्हर ओक'मध्ये सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा झाली, त्यात संजय राऊत यांचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जातं.

ना आदित्य, ना उद्धव ठाकरे, या नेत्याला मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती
Follow us on

मुंबई : आधी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. परंतु गेले अनेक दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे ‘चाणक्य’ मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता समोर येत आहे. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची माहिती सूत्रांनी (Shivsena CM Candidate) दिली आहे.

आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे कट्टर शिवसैनिक आणि खासदार अरविंद सावंत, ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे, राज्यसभा खासदार अनिल देसाई, विधानपरिषदेचे आमदार सुभाष देसाई यांचीही नावं चर्चेत आहेत. परंतु मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे संजय राऊतांचं नाव आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच संजय राऊत यांच्या नावाला पसंती दिल्याचं म्हटलं जातं.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदाबाबत जी चर्चा झाली, त्यात संजय राऊत यांचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जातं. संजय राऊत यांनी भाजपला शिंगावर घेत शिवसेनेची खिंड ताकदीने लढवली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पारड्यात झुकतं माप असल्याचं मानलं जातं.

सत्तेच्या सारीपाटावरचा मोहरा ‘संजय राऊत’

संजय राऊत यांनी कायमच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी भूमिका घेतली आहे. परंतु ‘शिवसैनिक’ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसेल, असे अनेक वेळा त्यांच्याच बोलण्यातून येणारे शब्द संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा जाण्याचे संकेत मानले जातात.

“मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरु शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असेल, आम्ही पाठिंबा देऊ. सत्तासंघर्ष संपला आहे. आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करतील. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडणार आहे.

महासेनाआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर रात्री 11.15 वाजताच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी जवळपास 1 तास 10 मिनिटं चर्चा (Shivsena CM Candidate) केली.