मुंबई : राज्यात केंद्रात भाजपसोबत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून सरकारच्या रोजगार निर्मितीतील अपयशावर टीका करण्यात आली आहे. मोदींनी 5 वर्षात 10 कोटी रोजगार निर्माण करण्याच्या आश्वासनाची जबाबदारी त्यांना नेहरु-गांधींवर टाकता येणार नाही, असे म्हणत शिवसेनेने उपरोधिक टोला लगावला.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण मागील 45 वर्षांतील सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाही आधार सामनाच्या अग्रलेखात घेण्यात आला. शिवसेनेने म्हटले, “मोदींचे सरकार येत आहे म्हटल्यावर सट्टा बाजार आणि शेअर बाजार उसळला, पण ‘जीडीपी’ घसरला आणि बेरोजगारीचा दर वाढला हे लक्षण काही चांगले नाही. बेरोजगारीचे संकट असेच वाढत राहिले तर काय करायचे यावर फक्त चर्चा करुन आणि जाहिरातबाजी करुन उपयोग नाही, कृती करावी लागेल. देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के झाला. मागील 45 वर्षांतला हा सर्वात जास्त आकडा आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयानेदेखील त्यावर आता शिक्कामोर्तब केले आहे.”
अग्रलेखात नितीन गडकरींनी बेरोजगारीच्या प्रश्नावर केलेल्या युक्तीवादाचाही समाचार घेतला आहे. “बेरोजगारीचा प्रश्न हा काही गेल्या 5 वर्षांत भाजपने तयार केलेला नाही असे नितीन गडकरी यांनी सांगितले. आम्ही त्यांचे मत मान्य करतो, पण दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते आणि त्या हिशेबाने मागील 5 वर्षांत किमान 10 कोटी रोजगारांचे लक्ष्य पार करायला हवे होते. ते झालेले दिसत नाही आणि त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही. रोजगारनिर्मितीत सातत्याने घट होत आहे हे सत्य आहे. केंद्र सरकारच्या नोकर भरतीतही 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे”, असेही शिवसेनेने नमूद केले.
शब्दभ्रमाचे खेळ करुन बेरोजगारी हटणार नाही
मोदींच्या भाषणांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना शिवसेना म्हणाली, “गेल्या 5 महिन्यांत फक्त मराठवाड्यातच 315 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचे चित्र विदारक आहे. शेती जळून गेली आणि हाताला काम नाही या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनीही नवी आशा घेऊन मोदी यांना मतदान केले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनीही मोदी यांच्या विजयास हातभार लावला आहे. त्यामुळे मागच्या 5 वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून 2019 मध्ये बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. देशात बुलेट ट्रेन येत आहे, त्यात एकालाही रोजगार मिळणार नाही. राफेल उद्योगातही रोजगाराच्या मोठ्या संधी नाहीत. चीनमध्ये काम करणाऱ्या 300 अमेरिकी कंपन्या तेथील गाशा गुंडाळून हिंदुस्थानात येत आहेत, असे निवडणुकीपूर्वी चित्र उभे केले. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर व्यापारी निर्बंध लादले आहेत. हे चित्र संभ्रमात टाकणारे आहे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन आणि बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही.”