चंदीगड : शिवसेनेने हरियाणा विधानसभा निवडणुकीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ला (Attack on Umar Khalid) करणाऱ्या आरोपीला उमेदवारी (Shivsena Hariyana Assembly Candidate) दिली आहे. नवीन दलाल असं या उमेदवाराचं नाव आहे. दलालला झज्जर जिल्ह्यातील बहादूरगडमधून तिकीट देण्यात आलं आहे. हरियाणात देखील 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रासोबतच मतदान होत आहे.
नवीन दलाल 29 वर्षीय स्वयंघोषित गोरक्षक आहे. त्याने 6 महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला आहे. माझे विचार आणि शिवसेनेची राष्ट्रवाद आणि गोरक्षणाची विचारधारा सारखीच आहे. त्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दलालने सांगितलं. दलालने भाजप आणि काँग्रेस दोघांनाही शेतकरी, शहीद, गाय आणि गरिबांचं काही देणंघेणं नसल्याचा आरोपही केला आहे. हे सर्व पक्ष केवळ राजकारण करतात, असाही आरोप दलालने केला आहे.
शिवसेनेचे दक्षिण हरियाणाचे अध्यक्ष विक्रम यादव यांनी देखील दलालच्या उमेदवारीला दुजोरा दिला आहे. तसेच गोरक्षा आणि देशविरोधी घोषणा देण्यांविरोधात भूमिका घेतल्यानेच दलालला उमेदवारी दिल्याची माहिती यादव यांनी दिली.
दरम्यान, 13 ऑगस्ट 2018 रोजी नवीन दलाल आणि दरवेश शाहपूर या त्याच्या साथीदाराने नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब बाहेर उमर खालिदवर गोळीबार केला होता, असा आरोप आहे. त्यांनी दोन गोळ्या झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली होती. या हल्ल्यात खालिद थोडक्यात बचावला. हल्ल्यानंतर दलाल आणि त्याचा साथीदार शाहपूर दोघे तेथून पसार झाले होते. मात्र, त्यांनी स्वातंत्र्यदिनाची भेट म्हणून हल्ल्याचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. या प्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
नवीन दलालवर उमर खालिदवरील हल्ल्यासह एकूण 3 फौजदारी गुन्हे दाखल आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची माहिती देण्यात आली आहे. बहादूरगडमध्ये त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल आहे. दिल्ली संसदीय मार्ग पोलिसांनी त्याच्यावर एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दलाल गाईचं कापलेलं शीर घेऊन भाजपच्या मुख्यालयात घुसला होता. हे दोन्ही गुन्हे 2014 मधील आहेत.