गटनेता निवड चुकीची, खासदार अरविंद सावंतांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार; निर्णयाच्या पुनर्विचार करण्याचीही विनंती

| Updated on: Jul 22, 2022 | 3:52 PM

लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी सावंत यांनी केलीय. घटनेच्या कलम 10 अ मध्ये गटनेता निवड पक्षाचा प्रमुख करतो असं नमूद करण्यात आलं आहे. सध्या सगळं अनैतिक आणि असंविधानिक सुरु असल्याचा आरोप सावंत यांनी माध्यमांशी केलाय.

गटनेता निवड चुकीची, खासदार अरविंद सावंतांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार; निर्णयाच्या पुनर्विचार करण्याचीही विनंती
अरविंद सावंत, खासदार, शिवसेना
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची लोकसभेत शिवसेना गटनेता म्हणून निवड करण्यात आलीय. ही निवड चुकीची असल्याचा दावा शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केलाय. सावंत यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. गटनेता निवडीचा अधिकार हा पक्षाचा आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी (Loksabha Speaker) घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी सावंत यांनी केलीय. घटनेच्या कलम 10 अ मध्ये गटनेता निवड पक्षाचा प्रमुख करतो असं नमूद करण्यात आलं आहे. सध्या सगळं अनैतिक आणि असंविधानिक सुरु असल्याचा आरोप सावंत यांनी माध्यमांशी केलाय.

सावंत पुढे म्हणाले की, ही लढाई आता एकट्या महाराष्ट्राची नाही तर देशाची आहे. आम्ही जी याचिका दाखल केली होती ती फेटाळून लावली असती मात्र आता ती घटनापीठाकडे जाणार हे काही खरं नाही. आम्ही लोकसभा अध्यक्षांना तीन पत्र दिली होती. तीन पत्र दिलेली असताना लोकसभा अध्यक्षांनी निर्णय दिला नाही. 19 जूनला सकाळी आम्ही पत्र दिलं होतं आणि दुपारनंतर त्यांची भेट घेतली. तर मग 18 तारखेला कसं पत्र दिलं? हे अशा पळवाटा शोधून सांगत आहेत. ही काय कारणं आहेत का? असा सवालही सावंत यांनी केलाय.

कौरवांपुढे पांडवांचा विजय झाला

सावंत यांनी कालही दिल्लीतून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती, ती शिवसेना आता हलली आहे. शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो आणि पुढेही कायम राहणार, असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय. रामायण महाभारतात ही परीक्षा द्यावी लागली. पण कौरवांपुढे विजय हा पांडवांचाच झाला. हा इतिहास आहे, असा थेट इशारा सावंत यांनी दिलाय.

राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला

शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी थेट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले. त्या वरळी मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे. युतीचा उमेदवार म्हणूनच त्यांना वरळीच्या मतदारांनी निवडून दिलं आहे. आशीर्वाद दिला. पण त्यांची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं ही गद्दाराची व्याख्या होऊ शकते का? हे तपासून पाहावं लागेल. गद्दार कोण याचे उत्तर वरळी विधानसभेतील मतदार येत्या निवडणुकीत देतील, असा इशारा राहुल शेवाळे यानी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.