मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत शिवसेना (Shivsena) नेते आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी दिले आहेत. इतकंच नाही, तर आदित्य ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला. अनिल परब यांनी शिवसेनेच्या अनेक विजयांचं शिल्पकार मानलं जातं.
ठाकरे घराण्यातील बहुप्रतीक्षित, ऐतिहासिक क्षण येऊ घातला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाकरे कुटुंबाची तिसरी पिढी निवडणुकांच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिलेच सदस्य असतील.
आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचं नेतृत्व करावं, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. या मागणीवर अनिल परब यांनी शिक्कामोर्तब तर केलंच, पण इथला जो उमेदवार आहे, तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो मुख्यमंत्री म्हणजेच आदित्य ठाकरे आहेत, असंही जाहीर केलं. आदित्य ठाकरेंना एक लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार, असा कार्यकर्त्यांना विश्वास यावेळी दिला.
‘वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा ‘ए प्लस’ मतदारसंघ आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारे या मतदारसंघातील दिग्गज एकाच मंचावर उपस्थित आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी इथूनच विधानसभा निवडणूक लढण्याचं निश्चित करावं, असं मत अनिल परब यांनी भाषणात व्यक्त केलं.
अनिल परब विजयाचे शिल्पकार
वांद्रे पूर्वमधील विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत शिवसेनेने भगवा डौलाने फडकवला होता. तृप्ती सावंत यांनी तब्बल 19 हजार मतांनी विजय मिळवला. मात्र या विजयाचे शिल्पकार अनिल परब ठरले. मतदारसंघातील प्रत्येक विभाग, प्रत्येक कॉलनी आणि प्रत्येक बूथचं योग्य नियोजन आणि समन्वय करुन अनिल परब यांनी मोठा विजय मिळवून दिला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही वरळीत शिवसैनिकांना देण्यात आले. यापूर्वी युवासेनेने आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनीही आपली इच्छा बोलवून दाखवली होती.
सध्या सुरु असलेल्या आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतही अनेक जण त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहेत. आदित्य ठाकरे यांना अनेकदा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी शिवसैनिक आणि जनता सांगेल, ते करेन असं म्हटलं होतं. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल, असं उत्तर दिलं होतं.
अनिल परब यांच्या मागणीचं आमदार सुनिल शिंदे आणि सचिन अहिर यांनी स्वागत केलं. या मेळाव्याला खासदार धैर्यशील मानेही उपस्थित होते.
एकीकडे, देवेंद्र फडणवीस पुढच्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विश्वास बोलून दाखवत आहेत. आपण युतीचे मुख्यमंत्री आहोत, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तर आदित्य ठाकरेंचं नाव शिवसेनेकडून पुढे करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपावरुन ‘आमचं ठरलंय’ सांगणाऱ्या युतीमध्ये धुसफूस होणार, की शांतपणे तोडगा निघणार, हे येणारा काळच ठरवेल.