मुंबईः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आजवर मराठा नेत्यांना मोठं होऊ दिलं नाही, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलाय. त्यावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदमांचे आरोप साफ खोटे आहेत. अशी वक्तव्य करून त्यांना जातीपातीचं राजकारण करायचंय. समाजात तेढ निर्माण करायची आहे. आता ते असे आरोप करणारच, कारण 1 तारखेला त्यांना घरी बसावं लागणार आहे, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्ट शिवसेनेकडूनच निर्णय देईल, असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांचा आज वाढदिवस आहे. मात्र रामदास कदम यांनी आज उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. 3 वर्षे शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माझ्या खात्याअंतर्गतचे निर्णय आदित्य ठाकरेंनी जाहीर केले, असेही रामदास कदमांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘ आज आमच्या आनंदाचा दिवस आहे…बाळासाहेब यांची ही शिवसेना आहे… आणि उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं आहे…ही जी विश्वास घातकी लोकं आहेत त्यांच्यामुळे काही होणार नाही. आणि येत्या एक तारखेला आई जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही जिंकू…
शिवसेनेतून बाहेर गेलेल्या एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य करण्याचं चंद्रकांत खैरे यांनी यावेळी टाळलं. मात्र नव्या शिवसैनिकांचा उत्साह प्रचंड असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजही असंख्य शिवसैनिकांकडून प्रतिज्ञा पत्र आलेली आहेत. शिवसेनेच्या मेळाव्यांना तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं.
रामदास कदमांवर आरोप करताना चंद्रकांत खैरे म्हणाले, तेसुद्धा जादूटोणा करणारे आहेत. त्यांनी मला खूप त्रास दिलाय. संभाजीनगरमध्ये साहेबांसमोर धमकी दिली होती. मी इथला वतनदार आहे. मराठवाड्याचा सुपुत्र आहे. हेसुद्धा नारायण राणेंसोबत काँग्रेसबरोबर जात होते. आम्ही तेव्हा आमदार होतो. त्यानंतर दिल्लीत गेलो. तिथं गेल्यावर रामदास कदम काय आहेत हे कळलं… असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं.