मुंबई : “नारायण राणेंचं शिवसेनेशी जुनं नातं आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले”, असा चिमटा शिवेसेना उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil criticized on Narayan Rane) यांनी काढला. नुकतेच भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्याोसबत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती. राणेंच्या या मागणीवर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर (Gulabrao Patil criticized on Narayan Rane) दिले आहे.
“नारायण राणेंचे शिवसेनेशी जुनं नातं आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे प्रेमाचे नातं आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
“कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती काही महाराष्ट्राने आणलेली नाही. जगासह देशात तिचा प्रादुर्भाव झाला आहे. ही एक आपत्ती आहे. राजकारणाची व्यवस्था नाही. या महामारीचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांमध्ये कुठे त्रुटी राहत असतील तर त्या सरकारच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण असं न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नाही. नारायण राणे यांच्यासारख्या मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला ‘या’ गोष्टी शोभत नाहीत”, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
“कोरोनाचा उद्रेक काय फक्त महाराष्ट्रात नाही. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. मग अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरातमध्येही लागू करावी, उत्तरप्रदेशात तसेच दिल्लीतही लागू करावी. देशातील इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे. कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? या दृष्टीने सूचना त्यांनी द्याव्यात, अशी आमची अपेक्षा आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे ?
“मी राज्यपालांना भेटण्यासाठी आलो होतो. त्याचे कारण असे आहे की, सध्या महाराष्ट्रात कोरोना संबंधिची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यपालांनी गांभीर्याने या गोष्टीकडे पाहावे. महाराष्ट्र आणि मुंबईत होणारे मृत्यू थांबवले पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करावेत. पण महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात रुग्णांची आणि तिथल्या परिस्थितीची दयनीय अवस्था आहे. सरकारचं लक्ष नाही असं म्हणणार नाही, पण सरकारचे काम नाही. हे सरकार अशी परिस्थिती हाताळू शकत नाही. हे चित्र स्पष्ट झाले आहे”, असं नारायण राणे म्हणाले होते.
“आज महाराष्ट्रात हजारच्या जवळपास मृत्यू झाले आहेत. या सरकारची कोरोना सोबत सामना करण्याची क्षमता नसल्याने या सरकारला आता नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट आणावी. राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा आणि आरोग्याच्या आणि रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी. अशी सूचना मी केली. महानगर पालिकेचे आणि राज्य सरकारचे रुग्णालय लष्कराच्या ताब्यात द्यावी. कारण ते परिस्थिती सुधारु शकतात असे मला वाटते”, असंही नारायण राणेंनी सांगितले.
संबंधित बातम्या :
“राज्यात राषट्रपती राजवत लागू करा”, भाजप खासदार नारायण राणे यांची राज्यपालांकडे मागणी
Corona | उद्धव ठाकरे सरकार फेल, महाराष्ट्रात लष्कर बोलवा : नारायण राणे