चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या, संजय राऊतांचा संभाजीराजे, उदयनराजेंना सल्ला

| Updated on: Jan 13, 2020 | 10:46 AM

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका (sanjay raut criticism on Book on Modi ) केली.

चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या, संजय राऊतांचा संभाजीराजे, उदयनराजेंना सल्ला
Follow us on

मुंबई : भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार (sanjay raut criticism on Book on Modi ) पडला. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत असून अनेक नेत्यांनी यावरुन भाजपवर टीका केली आहे. यावरुन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका (sanjay raut criticism on Book on Modi ) केली.

“महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा कोल्हापूरचे जे वंशज आहेत. ते सर्व भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मग या दोन्ही गाद्या आहेत त्यांचा महाराष्ट्राला सन्मान आहे त्या प्रमुख लोकांनाही शिवाजी महाराजांची तुलना योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या असे जर मी म्हटलं किंवा जनतेने सांगितलं तर चिडाचीड करण्याचे कारण नाही. तुमची नेमणूक भाजपने केली. कोणी भाजपचे आमदार आहेत. कोणी खासदार आहेत. कोणी माजी खासदार आहे. तुम्ही वंशज आहात. त्याबद्दल आम्हाला आदर प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानाबद्दल आमच्यासारख्या सर्व सामान्यांनी लढायचं आम्ही लढू आम्ही शिवसैनिक आहोत. तुम्ही तर त्यांचे वंशज आहात. तुम्ही त्यांचे नातं सांगता. मग तुमची जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुम्ही पटकन राजीनामे दिले पाहिजेत. देणार आहात का?,” असं संजय राऊत म्हणाले.

“ते न करता तुम्ही संजय राऊतांवर आगपाखड करताय. हा काय प्रकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली त्यांनीही तुमची भूमिका योग्य आहे, असे म्हणाले.

“आज के शिवाजी नरेंद्र मोदी… नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदीजीचं आहेत. मोदींची तुलना इतर कोणाशीही होणार नाही. पण छत्रपती हे सर्वांच्या वर आहेत. कधी मोदींना विष्णूचा तेरावा अवतार असल्याचे म्हटलं जात कधी शिवाजी राजे म्हटलं जाते. विशेष म्हणजे यात शिवाजी असा एकेरी उल्लेख केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी भूमिका घ्यावी असे माझं म्हणणं आहे,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले

“मग नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असेल, तरी छत्रपती शिवाजी आमचे दैवत आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील इतर प्रमुख नेत्यांनी म्हणजेच भाजपने याबद्दल भूमिका घ्यावी हे त्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगावे.” असेही राऊत म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रातील जनता भूमिका घेते तर त्यांच्या वंशजांनी भूमिका घेणं गरजेचे आहे. हा राज्याचा महाराष्ट्राचा अपमान आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे प्रेरणास्थान आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे. अशा पहिल्या हिंदवी स्वराज्य संस्थापकाशी कोणाशी तुलना होऊ शकत नाही,” असेही संजय राऊत म्हणाले

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जेव्हा तुलना करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं हा छत्रपतींच्या मोठेपणाचा अपमान आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे. देशाचे नेते आहेत. आम्हाला त्यांचा आदर आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांचा मान-सन्मान आम्ही करतो. पण तरीही किती मोठा नेता असेल. तरी छत्रपतींशी तुलना करणं हे योग्य नाही.” असेही ते म्हणाले.

“भाजपने हे पुस्तक मागे घ्यावे, या पुस्तकाची विक्री थांबवावी, आपला या पुस्तकाशी काही संबंध नाही. हे जाहीर करावं,” असं आवाहन राऊतांनी केलं.

“पुस्तकाच्या लेखकाचा इतिहास वादग्रस्त आहे. त्याने 15 वर्षांपूर्वी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला केला होता. मराठी माणसालाच आव्हान दिलं होतं, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी या पुस्तकावर माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला होता. त्यावरुन संभाजीराजेंनी ट्विट करुन, थेट उद्धव ठाकरेंना संजय राऊतांच्या जिभेला लगाम घालण्याचा सल्ला दिला होता.

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे काल (12 जानेवारी) प्रकाशन करण्यात आले. भाजपच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकात मोदींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे.

संजय राऊतांची टीका 

“छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… ‘छत्रपती शिवाजी महाराज’. निदान महाराष्ट्र भाजपने तरी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला. काहीतरी बोला.” असे संजय राऊत म्हणाले होते.

संभाजीराजेंचे उत्तर

त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे म्हणाले, “उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही.”

[crowdsignal poll=10489907]