मुंबई : भाजपने जाहीर करावं की आम्ही सरकार बनवण्यास असमर्थ आहोत. मग शिवसेना पुढचा विचार करेल. शिवसेना आशेवर नाही आत्मविश्वासावर जगते, असं रोखठोक वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut press conference) यांनी केले. संजय राऊत (sanjay raut press conference) यांनी आज (7 नोव्हेंबर) मुंबईतील सामना कार्यालय येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
बहुमत असेल तर सरकार स्थापन करा. बहुमत नसेल तर जनतेसमोर मान्य करा आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, असं संजय राऊत यांनी सांगितले.
50-50 टक्के सत्ता वाटप यामध्ये मुख्यमंत्रिपदाचाही समावेश आहे. ही पक्षाची भूमिका मी मांडतोय. अडीच वर्षे भाजपचा, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलावर युती झाली होती, असंही संजय राऊत यांनी सांगितले.
राऊत म्हणाले, शिवसैनिक दिलेल्या शब्दाला जागतो, दिलेले वचन पाळतो, शिवसैनिक पाठीत खंजीर खुपसत नाही. प्राण जाए पर वचन न जाए ही शिवसेनेची व्य़ाख्या आहे.
सुधीरभाऊ वारंवार बोलत होते महाराष्ट्राचा जनादेश आम्हाला मिळाला. मग सरकार स्थापनेचा दावा का नाही करत. राज्यपालांच्या भेटीनंतर रिकाम्या हाती का परतले?, असा प्रश्नही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
युती तोडण्याचं पाप किंवा दुसरा पर्याय निवडण्याचे पाप मी करणार नाही. ही उद्धवजींची भूमिका 24 तारखेपासून ठाम आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे नेहमीच आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांसमोर आपली भूमिका ठाम मांडली आहे. सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबाही दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपमुळे अस्थिरता निर्माण झालीय. लवकर सरकार स्थापन करुन महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळवून दिला पाहिजे, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.