मुंबई: शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत (Uday Samant) हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते, असा आरोप भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला होता. उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना या आरोपाला प्रत्युत्तर दिले. (Shivsena leader Uday Samant on Nilesh Rane accusations)
मी आजपर्यंत कधीही राणे कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची दखल घेतलेली नाही आणि इथून पुढेही घेणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीचा खुलासा मी दुपारी एक वाजता पत्रकारपरिषद घेऊन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे विरोधकांच्या असल्या आरोपांमुळे माझे कुठलेही राजकीय नुकसान होणार नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले. त्यामुळे आता पत्रकारपरिषदेत उदय सामंत काय खुलासा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीसांशी रत्नागिरीत गुप्त भेट, निलेश राणेंच्या दाव्याने खळबळ
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
मंत्र्याची भाजप नेत्याशी गुप्त भेट का?
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच तीन दिवसांचा कोकण दौरा केला. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला होता. “मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का?” असा सवाल करतानाच “गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत” अशी टीका फडणवीस यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?; फडणवीसांचा सवाल
देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ ठाकरेही कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला
(Shivsena leader Uday Samant on Nilesh Rane accusations)