औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर शिवसेनेने औरंगाबादेत (Aurangabad Vidhansabha Result) एमआयएमचा सुपडासाफ केलाय. जिल्ह्यातील सहाही जागांवर शिवसेनेने सुरुवातीपासूनच प्रचंड आघाडी घेत विजयी वाटचाल सुरु केली. औरंगाबाद (Aurangabad Vidhansabha Result) हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण गेल्या काही वर्षात एमआयएममुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती. याचा ताजा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला. लोकसभेला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले आणि एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले.
सिल्लोड मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली होती. पण अब्दुल सत्तार यांनी योग्य ती समीकरणे जुळवत मोठी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरी अखेर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांना 18745 मतांची आघाडी होती.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला होती. पण पाचव्या फेरीअखेर शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी 11 हजार मतांची आघाडी घेतली. पाचव्या फेरीअखेर शिवसेना उमेदवार संजय शिरसाट 2125, एमआयएम उमेदवार अरुण बोर्डे 3967, वंचितचे उमेदवार संदीप शिरसाट 3622 आणि अपक्ष राजू शिंदे यांना 9378 मते मिळाली.
औरंगाबाद मध्य मतदारसंघात 2014 ला एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. पण प्रदीप जैस्वाल यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलाय. आठव्या फेरीअखेर प्रदीप जैस्वाल (शिवसेना) 39498, नासेर सिद्धीकी (एमआयआम) 15547 मते मिळाली. जैस्वाल 23951 मतांनी आघाडीवर आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघातही शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलंय. शिवसेनेचे संदिपान भुमरे यांना पाचव्या फेरीअखेर 6957 मतांची आघाडी होती.