मुंबई : ‘मातोश्री’च्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व मतदारसंघातच शिवसेनेला पराभवाचा धक्का बसला (Shivsena Lost in Vandre East) आहे. शिवसेनेचे उमेदवार असलेले महापौर विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आहेत. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा फटका सेनेला बसल्याचं चित्र आहे.
झिशान सिद्दीकी हे 36 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना 31 हजाराच्या आसपास मतं मिळाली आहेत. अपक्ष निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या बंडखोर तृप्ती सावंत यांना 23 हजारांच्या घरात मतं मिळाली. सेनेला बंडखोरी थोपवण्यात यश आलं असतं, तर शिवसेनेला आपला गड राखता आला असता. मनसेचे अखिल चित्रे हे चौथ्या क्रमांकावर आहेत.
वांद्रे पूर्व मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याचं सांगत गेल्या आठवड्यात तृप्ती सावंत यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं. आमदारपदी असलेल्या तृप्ती सावंत यांनी तिकीट डावलल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी मागे घेण्याची विनंती खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतरही तृप्ती सावंत यांचं बंड (Shivsena Lost in Vandre East) शमलं नव्हतं.
वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी
2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.
यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.
राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता