ज्याची मैत्री कराल त्याचे वाटोळे लावाल, भास्कर जाधव इतके का संतापले?

| Updated on: Dec 11, 2023 | 6:27 PM

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोकणासाठी एक स्वतंत्र दर्जाचा अधिकारी नेमू, स्वतंत्र सचिव देऊ असा शब्द दिला. पण त्याचे काहीच झाले नाही याची आठवण करून दिली. याचवेळी एका भाजप आमदाराने खाली बसून एक विधान केलं. त्यावरून भास्कर जाधव संतापले.

ज्याची मैत्री कराल त्याचे वाटोळे लावाल, भास्कर जाधव इतके का संतापले?
SHIVENA MLA BHASKAR JADHAV
Follow us on

नागपूर | 11 डिसेंबर 2023 : विधानसभेमध्ये विरोधकांनी नियम १०१ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हा या चर्चेचा विषय होता. यावेळी बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. मात्र, यावेळी सत्ताधारी पक्षाचा आमदारांनी काही टिप्पणी केली. त्यावर आमदार भास्कर जाधव संतापले आणि त्यांनी थेट भाजपला लक्ष्य केले. अजितदादा यांच्याबद्दल काही बोलणार नाही. ते आता तिथे जाऊन बसले आहेत. पण, मी भूमिका बदलत नाही. माझ्या सरकारवरही मी आसूड ओढले आहेत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अल्पकालीन चर्चेत सहभाग घेताना आमदार भास्कर जाधव यांनी काही सदस्य सांगतात की सरकार आमच्या बांधावर आले. त्या बांधावर गेले. पण, आमचा कोकण त्यात येत नाही का? महाडला, इर्शालवाडीत दरड कोसळली. चिपळूण, संगमेश्वर पाण्याखाली गेले. पावसात अधिक नुकसान झाले. त्यावेळी नुकसानीसाठी सरकार मदतीला येणार आहे की नाही? नुकसानच दिसले नाही तर मदतीची भूमिका कशी घेणार? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.

कोकण ही डॉलर भूमी

कोकणात फक्त एक पिकी शेती आहे. पावसाला सुरवात झाली तर आमची शेती सुरु होते. एक हंगामी शेती आहे. कोकणच्या हापूस आंब्याची चव कुणालाही नाही. कोकण ही डॉलर भूमी आहे. आंबा परदेशात पाठवतो. तो डॉलर मिळवून देतो. समुद्रातून मिळणारे मासे परदेशात पाठवतो ते ही डॉलर मिळवून देतात. कोकणात जी विविध फळे आहेत त्याची वाहतूक करा, अशी मागणी त्यांनी केली.

नाशिक अन्य भागात द्राक्ष, डाळिंब याचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई दिली जाते. त्याचे होणारे नुकसान संपविले. परंतु, कोकणात होणाऱ्या नुकसानीचे काय? राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अजितराव घोरपडे हे कृषिमंत्री होते. ज्यांनी सहकारामध्ये काम केले त्यांना सोबत घेतले. कोकणात काम केले. पण, त्या त्या सरकारने पुढे काहीच केले नाही. आम्हाला 20 हजार कोटी उधार द्या. ते आम्ही फेडू. शिवाय सरकारच्या अर्थव्यवस्थेला उभारी देऊ. बाकीच्या भागाला का दिले? हा प्रश्न नाही. कोकणाला काय दिले हा प्रश्न आहे असे ते म्हणाले.

कोकणचा एकत्रित डाटाच तयार नाही

1936 ला सभागृह अस्तित्वात आले. पण, तेव्हापासून आजपर्यंत एकदाही कोकणच्या विकासावर कधीच स्वतंत्रपणे चर्चा झाली नाही. विधानपरिषदेत आमदार असताना मी आणि गुरुनाथ कुलकर्णी यांनी चर्चा घडवून आणली. तेव्हा तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी उत्तर द्यायला सात दिवस घेतले. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा यांचे प्रश्न वेगळे असतात. आमची उत्तर तीच असतात. परंतु, कोकणाच्या प्रश्नावर उत्तर काय देऊ असे ते म्हणाले होते. कारण, कोकणचा एकत्रित डाटाच तयार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

झोपाळ्यावर फाफडा आणि ढोकळा खात होते

मी टीका केली का कुणावर? पण यांना सारखं अडीच वर्ष, अडीच वर्ष दिसत आहे. यांनी कोरोना आणला. का वेळेत फ्लाईट, विमानतळ बंद केली नाही. वेळ होती तेव्हा झोपाळ्यावर फाफडा आणि ढोकळा खात होते? जिकडे जातील तिकडे यांना फक्त खायचे सुचते. कोरोना काळात आमच्या सरकारने चागले काम केलं म्हणून त्यांच्या पोटात दुखतेय. उत्तर प्रदेशमध्ये प्रेते तरंगत होती. मध्यप्रदेश, गुजरातमध्ये प्रेते रस्त्यावर होती. पण, महाराष्ट्रात सन्मानाने त्यांच्यावर अंत्यविधी होत होता. जागतिक आरोग्य संघटना, सुप्रीम कोर्ट, पार्लमेंट, राष्ट्रपती आणि जगाने महाराष्ट्राचे कौतुक केले हे यांच्या पोटात दुखत आहे अशी टीका आमदार जाधव यांनी केली.

आघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले त्याचे कौतुक केले. आघाडीमध्ये दादा होते, आम्ही नाही म्हणत नाही. पण, आता ते तिकडे आहे. तरी त्यांना साद घालत आहे. पण, यांना ती अडीच वर्ष खुपत आहेत. मला तुमच्यात किती दम आहे ते बघायचे आहे. तुम्ही म्हणत असाल तर आता ठराव आणतो. करा दादांना मुख्यमंत्री करा आहे हिम्मत? तुम्ही तर ज्याची ज्याची मैत्री कराल त्याचे वाटोळे लावाल अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी यावेळी केली.