रत्नागिरी : कोकणातील 15 विधानसभा जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने कोकणावरचा आपला दबदबा कायम राखलाय. या निकालानंतर आता शिवसेनेच्या या आमदारांमध्ये (Shivsena MLA Lobbying for Ministership) मंत्रीपदासाठी चढाओढ पहायला मिळतेय. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 शिवसेना आमदार या चढाओढीत (Shivsena MLA Lobbying for Ministership) सर्वात पुढे आहेत. उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचा यात समावेश आहे. सिंधुदुर्गमध्ये दिपक केसरकर आणि वैभव नाईक यांच्या नावांची देखील चर्चा रंगलीय.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. रत्नागिरी सिंधुदूर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यातील 15 विधानसभा जागांपैकी 9 जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यामुळे शिवसेनेने कोकणातील आपलं वर्चस्व कायम राखल्याचं दिसत आहे. एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ पहायला मिळतेय. दुसरीकडे कोकणात मंत्रीपदासाठी आता जोरदार लॉबिंग सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यात सर्वात आघाडीवर उदय सामंत यांचे नाव आहे. म्हाडाचे अध्यक्ष पद भुषवलेल्या सामंतांना आता कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे राजन साळवी देखील यंदा मंत्रीपदाची आस लावून बसले आहेत. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत राणेंशी संधान बांधल्याच्या आरोपामुळे राजन साळवींच्या अडचणीत वाढ झालीय. यात उदय सामंत यांना रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांचेही आव्हान असणार आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय योगेश कदम यांना देखील मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. मात्र, रामदास कदम यांना मंत्रीपद दिले गेले, तर योगेश कदम यांचा पत्ता कट होवू शकतो, असंही बोललं जात आहे. नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
कोण आहेत उदय सामंत?
उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 44 वर्षीय सामंत यांनी डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. सारस्वत ब्राम्हण कुटुंबातून आलेल्या सामंत यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. ते मागील चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीत असताना ते रत्नागिरीचे पालकमंत्री आणि 14 खात्यांचे राज्यमंत्री होते. म्हाडाच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.
कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 54 वर्षीय साळवी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मराठा कुटुंबातून येणारे साळवी सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. जैतापूर आणि नाणार प्रकल्पाविरोधात त्यांची भूमिका महत्वाची होती.
कोण आहेत भास्कर जाधव?
भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. 62 वर्षीय जाधव यांचं शिक्षण अकरावी (जुनी). मराठा कुटुंबातून येणारे भास्कर जाधव 2004 ते 2014 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल. राष्ट्रवादीत असताना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद आणि 14 खात्यांचे राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते.
कोण आहेत योगेश कदम?
योगेश कदम हे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव असून दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 33 वर्षीय कदम शिवसेनेच्या तरुण चेहऱ्यांपैकी एक आहेत. शिक्षणाने पदवीधर असलेले आणि मराठा कुटुंबातून येणारे योगेश कदम आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत.
सामंत, साळवी, जाधव आणि कदम यांची नावे चर्चेत असली तरी युवा चेहरा म्हणून योगेश कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांना मंत्रीपद मिळू शकतं, असंही सांगितलं जात आहे. एकाच जिल्ह्यात दोघांना मंत्रीपद मिळालं, तर सेनेची ताकद आणि पक्कड अधिक मजबूत होऊ शकेल, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे सिंधुदूर्गात देखील 2 नावांची मंत्रीपदासाठी चर्चा आहे. यात सावंतवाडीतून विजयी झालेले दिपक केसरकर आणि कुडाळचे जायन्ट किलर ठरलेले वैभव नाईक यांचा यात समावेश आहे. दिपक केसरकर यांना गृहराज्यमंत्री असताना निवडून येण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांची कॅबीनेट मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुडाळमधून मागील निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव केलेल्या वैभव नाईक यांनाही यावेळी मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
कोण आहेत दिपक केसरकर?
दिपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 65 वर्षीय केसकर यांनी बीकॉमचं शिक्षण घेतलं आहे. ओबीसी समाजातून येणाऱ्या केसकर यांनी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे. ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
वैभव नाईक कोण आहेत?
वैभव नाईक कुडाळ विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडुकीत नारायण राणेंचा पराभव करत ते जायन्ट किलर ठरले होते. मराठी कुटुंबातून येणाऱ्या 42 वर्षीय नाईक यांनी बीएपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
सिंधुदुर्गात राणेंना शह देण्यासाठी 2 शिवसेना आमदारांना शिवसेना मुद्दाम ताकद देईन असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. मात्र, सध्या या निमित्ताने कोकणातील शिवसेनेत मंत्रीपदासाठी चांगलीच लॉबिंग सुरू आहे. मंत्रीपद मिळवून आपला बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यावर अनेकांचा भर आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुणाला मंत्रीपद देणार आणि कुणाला नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.