मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अखेर शिवसेना पक्षप्रमुखांनी नवा आदेश दिला आहे. या प्रमाणे आता शिवसेनेच्या सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगण्यात आले आहे. (Shivsena MLA). मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहा, असा आदेश या आमदारांना देण्यात आला. राज्यात बळीराजा संकटात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्या, असंही या आमदारांना सांगण्यात आलं. त्यामुळे अखेर 5 दिवसांनंतर शिवसेनेचे हे सर्व आमदार त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत (Shivsena MLA).
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता आमदार फुटू नये या भीतीने शिवसेनेने गेल्या पाच दिवसांपासून आपल्या आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना हॉटेलमध्ये भेटून पक्षप्रमुखांचा आदेश सांगितला.
“अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम त्या भागातील आमदाराचं आहे. त्यासाठी मतदारसंघात परत जाऊन शेतकऱ्यांची मदत करणे, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे की नाही हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश देण्यात आले”, अशी माहिती आमदार सुनिल प्रभू यांनी दिली.
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. पण सध्या बळीराजा संकटात आहे. त्यांना आमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आम्ही मतदारसंघात परत जात आहोत”, अशी माहिती सुनिल प्रभू यांनी दिली.
दुसरीकडे, गेल्या 5 दिवसांपासून काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूरमध्ये ठेवलं होतं. ते सर्व 44 आमदार आज मुंबईत परतले. त्यानंतर आता शिवसेनेनेही त्यांच्या आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत.