मुंबईतील कोस्टल रोडवरुन ठाकरे बंधू आमने-सामने

| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोडवरुन मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण तापणार याची झलक आज मुंबईत पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळीवाड्यातील मच्छिमारांची भेट घेतली. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कोस्टल रोडचं आज भूमीपूजन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे कोळी बांधवांचा विरोध आहे. मच्छिमारांनी काही दिवसांपूर्वीच […]

मुंबईतील कोस्टल रोडवरुन ठाकरे बंधू आमने-सामने
Follow us on

मुंबई : राजधानी मुंबईतील कोस्टल रोडवरुन मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकारण तापणार याची झलक आज मुंबईत पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोळीवाड्यातील मच्छिमारांची भेट घेतली. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कोस्टल रोडचं आज भूमीपूजन करण्यात आलं. या प्रकल्पामुळे मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे कोळी बांधवांचा विरोध आहे.

मच्छिमारांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची भेट घेत आपली बाजू मांडली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी कोळीवाड्यात जाऊन मच्छिमारांची समस्या जाणून घेतली. तर दुसरीकडे हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू या प्रकल्पाच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत.

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. या मार्गात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी फेस या दरम्यान विरोध आहे. कारण, अगोदरच उभा असलेला वरळी सी फेस आणि त्यात कोस्टल रोडचे पिलर यामुळे मासेमारी कठिण होणार असल्याचं कोळी बांधवांचं म्हणणं आहे.

कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं, समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी, अशी कोळी बांधवांची मागणी आहे. शिवाय माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात, वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे, अशीही मागणी आहे. कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजूबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता असल्याचंही बोललं जातं.

कोस्टल रोडमुळे प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

भूमीपूजन कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यामुळे भाजप नेत्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली.